गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०२१

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक (महाराष्ट्र राज्य, भारत) आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत, काही प्राचीन मूर्ती आणि मंदिर रचनेसाठी प्रसिद्ध आहेत तर काही वाईनरीज आहेत. 


पण अशी एक जागा आहे जिथे यापैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही संपूर्ण भारतातील लोकांना तेथे जाण्याची इच्छा असते. त्या स्थळाचे नाव आहे भगूर!

भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे. जर आपण नाशिकहून जात असाल तर आपल्याला देवळाली लष्करी भागातील सुंदर परिसर ओलांडून जावे लागेल. स्वच्छ आणि सुंदर, उत्तम देखभाल केलेल्या बागा आणि इमारती आणि खूप मोठमोठे, शतकभराचे जुने वृक्ष ह्यामुळे हा रस्ता नक्कीच संस्मरणीय होतो. 

मला खात्री आहे की आपणा सर्वांना भगूर बद्दल माहिती असेल आणि प्रत्येक भारतीयाला भगूरला भेट द्यावीशी का वाटते ते देखील माहिती असेल. 

भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजिक कार्यकर्ते, द्रष्टे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मस्थान आहे. 

असे म्हणतात की या गावचे नाव भृगु ऋषींच्या नावावरून पडले आहे. भृगु ऋषींचा आश्रम ह्या भागात होता.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा जन्म २७ मे १८८३ ह्या दिवशी भगूर येथे त्यांच्या वडिलोपार्जित घरात झाला. सावरकर वाडा म्हणून ओळखली जाणारी ही वास्तू बरीच वर्षे भारतीय पुरातत्व विभागाकडे होती आणि सध्या सावरकर स्मारकाचे श्री. रणजित सावरकर हे ह्या वास्तूची व्यवस्था पाहत आहेत. इथे लवकरच सावरकर संग्रहालय विकसित केले जाणार आहे.





स्वातंत्र्यवीर सावरकर 


सावरकर वाडा 


सावरकर वाड्याचा काही भाग 


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांची कविता - स्वातंत्र्यदेवी स्तोत्र 





जीर्णोद्धाराच्या आधी व नंतर 




दार बंद कारण्यासाठी जुनी पद्धत -आगळ 


बाहेरून बघताना ही वास्तू दोन मजली असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात तिच्यामध्ये तीन मजले आहेत. एक भूमिगत गुप्त मार्गदेखील आहे, जो घरापासून नदीपर्यंत जातो. आता हा भुयारी रस्ता पुढे बंद केलेला असला तरी आपण सुरुवातीच्या पायऱ्या अजूनही पाहू शकतो! 

आपण ह्या घरात धान्य ठेवण्याची जुनी व्यवस्था पाहू शकतो. धान्य ठेवण्यासाठी भिंती बांधून साठवणीची जागा तयार केली आहे. खालच्या मजल्यावर तिला एक लहान तोंड केलेले आहे. वरून पाहिल्यास ते लिफ्ट च्या शाफ्टसारखे दिसेल. जेव्हा जेव्हा धान्य आवश्यक असेल तेव्हा खालच्या मजल्यावरील तोंडातून धान्य घ्यायचे!

स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या १४/१५ व्या वर्षी सशस्त्र क्रांतीची शपथ जिथे घेतली होती ती जागा म्हणजे त्यांच्या भगूरमधील घरातले देवघर. ज्या मूर्तीच्या समोर त्यांनी शपथ घेतली होती, त्या देवीची मूर्ती पिढ्यानपिढ्या त्यांच्या घरात होती. पण २० व्या शतकाच्या सुरुवातीस, सर्व सावरकर बंधू भगूरच्या बाहेर असल्याने, ती मूर्ती भगूरच्या खंडोबा मंदिरामध्ये ठेवली गेली. 

देवीची ही मूर्ती अतिशय सुंदर आहे आणि ती पितळ किंवा पंचधातूची बनवलेली असावी असे वाटते. देवीच्या हातात तलवार, कमळ, शंख, दिवा आणि इतर आयुधे आहेत.











सावरकरांनी चौदा/ पंधराव्या वर्षी ह्या देवीसमोर घेतलेली प्रतिज्ञा अशी होती," महिषासुर मर्दिनी, मला आशीर्वाद दे. माझ्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारितां मारितां मरेतो झुंजेन. चाफेकरांसारखा मरेन किंवा शिवाजीसारखा माझ्या मातृभूमीला स्वराज्याचा राज्याभिषेक करवीन." मातृभूमीच्या स्वराज्यासाठी व सुराज्याची ते अखेरपर्यंत झटले. 

 तिन्ही सावरकर बंधूंनी जिथे आपले प्राथमिक शिक्षण घेतले ती शाळा आपण भगूर मध्ये पाहू शकतो.




 


आपण सावरकरांचे साहित्य तसेच त्यांच्यावर लिहिले गेलेले इतर साहित्य व सीडीज सावरकर वाड्यात खरेदी करू शकतो.

जेव्हा सावरकर अंदमान जेलमध्ये होते तेव्हा त्यांना गळ्यात एक कैद्याचा बिल्ला घालायला लागायचा. त्याची प्रतिकृती आपण सावरकर वाड्यात पाहू शकतो. त्या बिल्ल्यावर कैद आणि सुटकेच्या दिनांकांच्या मध्ये आपल्याला 'D' दिसेल. 'D ' म्हणजे डेंजरस. 


 


 
आपल्या राष्ट्रावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी भेट द्यावी अशी दोन ठिकाणे म्हणजे भगूर येथील सावरकरांचे जन्मस्थान आणि सावरकर ज्या कोठडी मध्ये होते ती अंदमानमधील कोठडी

शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०२१

फेंचिहू, लाँगयिन मंदिर आणि हिनोकी गाव, तैवान

 फेंचिहू हे गाव, १९व्या शतकाच्या सुरुवातीला अलीशान आणि चियायी दरम्यान अलीशान फॉरेस्ट ट्रेनच्या थांबा म्हणून विकसित केले गेले होते. रेल्वेमध्ये इंधन भरण्यासाठी किंवा माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये माल भरण्यासाठी हा थांबा फार उपयोगी व आवश्यक होता. 

फेंचिहू हे डोंगराच्या उतारावर वसलेले एक लहान गाव आहे आणि समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मीटर उंचीवर आहे. आता ते एक पर्यटन स्थळ म्हणून तसेच तिथल्या एका जुन्या रस्त्यासाठी प्रसिद्ध आहे. 

हा जुना रस्ता डोंगराच्या उतारावर असल्याने, स्टेशनपासून इथे जाताना खूप चढ आहे. मागच्या शतकात हा रस्ता विविध उद्योगधंद्यांमुळे अतिशय भरभराटीला आलेला रस्ता होता. सध्या देखील विविध रेस्टॉरंट्स आणि स्मृतिचिन्हे, भेटवस्तू, कलावस्तू विकणारी दुकाने दोन्ही बाजूला असल्याने, रस्ता दुकानांनी आणि माणसांनी गजबजलेला असतो. ढगांनी त्या ठिकाणच्या सुंदर वातावरणात भर घातली आहे.




Abundant Bamboos in the region 





The famous Fenchihu Old Street 



Shops on Fenchihu Old Street 



The famous Fenchihu Old Street 



Plum/Cerries?




Dancing dolls



The famous Fenchihu Old Street 




 Fenchihu 




Houses on the slope




Clouds descending on the road




Clouds !!







फेंचिहू रेल्वे स्टेशन ट्रेन आणि बस दोन्हीसाठी महत्वाचा थांबा आहे. 
तिथे जवळच एक रेल्वे संग्रहालय आहे. तिथे आपल्याला अलीशान वन रेल्वे ची सगळी जुनी माहिती, फोटोज, मॉडेल्स असे सगळे बघायला मिळते.

गेल्या शतकातील वास्तुशैली आणि सतत खाली उतरणारे ढग, ह्या दोन्हीमुळे ह्या गावाला खास व्यक्तिमत्व मिळाले आहे. इथे नेहमी सिनेमा आणि सिरियल्सची शूटिंग तर चालू असतातच पण प्री वेडिंग फोटो शूट साठी पण हे लोकप्रिय ठिकाण आहे. 






Pre wedding photo shoot?




Forest Train Museum



 

लाँगयिन मंदिर

चुकौ गावातील लॉंगयिन मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर मास्टर दाओजीला समर्पित आहे आणि त्यामुळे भक्तमंडळी इथे नेहमी येतात.

हा भाग, अलीशान डोंगराळ प्रदेशाचे प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे त्या भागात प्रवास करणारे लोक देखील, प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी ह्या मंदिरात येतात. 

हे मंदिर दोन दूरचित्रवाणी मालिकांमधील सुमारे 1000 भागांमध्ये दिसले आणि खूप लोकप्रिय झाले! प्रार्थना आणि पूजा करताना धूप किंवा उदबत्ती जाळणे हे बहुतेक इथे अत्यंत महत्वाचे असते. मंदिरात सगळीकडे उदबत्तीचा धूरच धूर होता.



The Longyin Temple



Bloom!



Happy!



Beautiful Surroundings









 


 

येथे, ह्या फोटोत आपण मंदिराच्या मागे एक पूल पाहू शकता. मंदिराजवळ दोन सस्पेन्शन किंवा निलंबी पूल आहेत. दोरखंडांनी बांधलेले हे पूल जपानी सरकारच्या काळातले आहेत. हे पूल फानलु गावातील बझहांग नदी ओलांडण्यासाठी बांधले गेले होते. त्यामुळे अलीशान डोंगर भाग बाकी सर्व भागांना वाहतुकीने जोडण्यासाठी हे पूल महत्वाचे होते. 

आता वाहतुकीसाठी महामार्ग बांधला गेला असला तरी हे जुने पूल पर्यटकांसाठी फोटो स्पॉट म्हणून अजूनही आकर्षणाचे केंद्र आहेत. पुलांची नावे ' इंटर्नल' आणि 'एव्हरलास्टिंग' पूल अशी आहेत. 

वास्तविक जपानी राजवटीच्या काळात त्यांना जपानी सम्राट आणि राजकुमार यांच्या स्मरणार्थ तियांचांग आणि दिजौ पुल असे नाव देण्यात आले होते. 




































 
हिनोकी गाव
इथे कायम स्वरूपी सांस्कृतिक प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. हे चियायी शहराच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट ह्या भागात आहे. 
जपानी राजवटीच्या काळात, या इमारती अलीशान वन रेल्वेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने म्हणून बांधल्या गेल्या होत्या. आता या इमारती एका सांस्कृतिक प्रदर्शनासाठी उपयोगात आणल्या गेल्या आहेत. इमारतींच्या वास्तुशैलीमुळे आपण जपानमध्ये असल्यासारखे वाटते!

चियायी शहराच्या इतिहासाविषयी आणि जपानी आक्रमणाच्या आणि राजवटीच्या काळात काय बदल झाले त्या विषयी बरीच माहिती येथे दिली आहे.
 
या सायप्रस फॉरेस्ट लाइफ व्हिलेजमध्ये बरीच दुकाने आणि रेस्टॉरंट्ससुद्धा आहेत आणि ह्या सगळ्यामुळे ते चियायी शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे. 

तिथली सुंदर बाग, लहान लहान तळी, त्यातील विविध रंग छटांची वॉटर लिलीज सगळेच रमणीय होते.






















Japanese ambience 




The old Japanese dormitories




And now baseball is Taiwan's national sport




Iconic Wood logs



चियायी पासून, तैवानमधील बर्‍याच मोठ्या शहरांना जाण्याकरिता रेल्वेज उपलब्ध आहेत. हायस्पीड ट्रेनचे ताइपेईशीही कनेक्शन आहे.
ताइपेई बहुतेक सर्व प्रगत देशांच्या राजधानीच्या शहरांप्रमाणेच एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, परंतु तैवानच्या ग्रामीण आणि वनपरिक्षेत्रात जाऊन आलात की आपल्याला तैवानची खरी ओळख होते. आपण तैवानचा आत्मा पाहू शकतो. अर्थात हे सगळ्याच देशांविषयी खरे आहे म्हणा!!

 #PlacesToVisitInTaiwan #AroundChiyayi #WeekendInTaiwan #AlishanToChiyayi
 

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...