गीताजयंती नुकतीच म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी साजरी केली गेली. जगातील हे एकमेव आणि अनोखे उदाहरण आहे, जिथे एका पुस्तकाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सध्या वातावरणात सगळीकडे कृष्ण भक्ती आहे, तेव्हा मला भगवान कृष्णाच्या महान भक्त संत मीराबाईंच्या गावाबद्दल, घराबद्दल लिहायला आवडेल.
महान कवी व कृष्णभक्त असलेल्या संत मीराबाई यांचे मूळ ठिकाण राजस्थानमधील मेडता हे आहे. त्यांचे जन्मस्थान हे मेडता जवळील एक छोटेसे गाव आहे आणि बालपणी त्या मेडता येथे राहिल्या होत्या.
Young Meerabai Raja Ravi Varma's painting 📷 wikipedia
मेडता हे गाव भारतातील राजस्थान राज्याच्या नागौर जिल्ह्यात आहे. हे गाव पुष्कर जवळ आहे. पुष्कर हे ठिकाण पुष्कर तलाव आणि ब्रम्हा मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. आपण पुष्करहुन मेडता आणि नागौर ची एक दिवसाची ट्रिप करू शकतो. पुष्करपासून मेडता फक्त ६१ कि. मी. अंतरावर आहे. मेड़ता- जोधपूर हे अंतर १२५ कि.मी. आणि मेडता जयपूर हे अंतर २१० कि. मी. आहे. पुष्करहून बिकानेरला जाताना आम्ही मेडता येथे गेलो होतो. राजस्थानमधील रस्ते खरोखर चांगले आहेत. राजस्थानमधील महामार्गांवर अधुनमधून नीलगाईंचे दर्शन होईल !!
Pushkar Lake
संत मीराबाईंचा जन्म १४९८ मध्ये जोधपूर साम्राज्याचे संस्थापक राव जोधामल यांच्या कुटुंबात झाला. ते मीराबाईचे पणजोबा होते. बालपणी त्या आजोबा राव दुदामल यांच्याजवळ मेडता येथील राजवाड्यात राहिल्या होत्या. राव दुदामल हे मेडता राजपूत कुळाचे संस्थापक होते. मीराबाईंचे संगीत, धार्मिक ज्ञान, राजकारण आणि युद्धकलेचे शिक्षण घरीच झाले. त्या कृष्णाच्या महान भक्त होत्या आणि त्यांनी आपले जीवन कृष्णाला समर्पित केले होते.
त्यांचे लग्न चित्तोड येथील युवराज भोजराज ह्यांच्याशी झाले होते. त्या एक महान संत आणि भक्तिमार्गातील प्रसिद्ध कवियत्री होत्या. त्यांची गीते सर्वश्रुत आहेत. त्यांनी पुष्कर, वृंदावन, द्वारका अशा अनेक ठिकाणी प्रवास केला होता आणि १५४६ मध्ये त्यांचे द्वारकेला निधन झाले. त्यांच्या मृत्यूविषयी रहस्यच आहे. नेमका त्यांचा मृत्यू कसा झाला कोणाला माहिती नाही. असे म्हणतात की त्या द्वारका येथील कृष्णमूर्तीत विलीन झाल्या.
मेडता येथे त्यांचे वडिलोपार्जित घर, जिथे त्या लग्न होईपर्यंत राहिल्या होत्या ते आणि त्या कृष्णाची जिथे पूजा करायच्या ते मंदिर असे आपण पाहू शकतो.
Krishna Mandir, Merta.
ह्या कृष्ण मंदिरामध्ये कृष्ण चतुर्भुजनाथ रूपात म्हणजे चार हात असलेली अशी मूर्ती आहे. चतुर्भुजनाथांच्या मूर्तीच्या अगदी समोरच मीराबाईंची मूर्ती आहे. असे वाटते की ते दोघे एकमेकांकडे पहात आहेत.
Meerabai Idol in the temple. 📷 Commons Wikimedia
हे मंदिर मीराबाईंचे आजोबा राव दुदामल यांनी बांधले होते आणि तिथे मीराबाई कृष्णाची पूजा करायच्या! आणखी एक छोटी पंचधातूची कृष्ण मूर्ती दाखवली जाते. मीराबाई लहान असल्यापासून त्या मूर्तीची पूजा करायच्या असे म्हटले जाते.
मंदिराच्या आतील भागात सगळीकडे काचा आणि आरसे लावलेले नक्षीकाम आहे. मीराबाईंच्या आयुष्यातील प्रसंग एकतर पेंटिंग्ज किंवा कोरलेल्या काचकामाच्या रूपात दाखवलेले आहेत.
शहराच्या मध्यभागी असलेले हे मंदिर मेडताच्या मुख्य बाजारपेठेत आहे. येथे आपल्याला स्थानिक जीवनाची झलक बघायला मिळते. मंदिराच्या दर्शनासाठी येणाऱ्या लोकांसाठी राखून ठेवलेले असे पार्किंग नसल्यामुळे मंदिराच्या मागच्या गल्लीत गाडी पार्क करावी लागते.
हे मंदिर केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर भारताच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक इतिहासाचा एक भाग आहे म्हणूनही बघायला हवे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ नसले तरी बघायला हवे. मंदिर अजूनही नांदते प्रार्थनास्थळ आहे. अनेक भक्त ह्या मंदिरात येत असतात. मेडता नगरातले बरेच रहिवासी ह्या मंदिरात रोज येतात.
Residence of Meerabai
मीराबाईंच्या आजोबांचा, राव दुदामल यांचा हा राजवाडा आहे. युवराज भोजबरोबर लग्न होईपर्यंत मीराबाई येथेच राहत होत्या. मीराबाईंच्या आयुष्यातील विविध घटनांचे चित्रण आणि फलक येथे पाहायला मिळतात. येथे देखील मीराबाईंची मूर्ती आहे आणि एक छोटेसे संग्रहालय देखील आहे. आम्ही गेलो होतो तेव्हा असे वाटले की १९ व्या शतकात, काही वर्षे या जागेचा उपयोग मुलींची शाळा म्हणून केला जात होता. मागच्या अंगणात एक छोटी बाग आहे आणि तेथे राधाकृष्ण मूर्ती आहे.
Radha Krishna
आजुबाजूची इतर बरीच राजपूत राज्ये मुघलांच्या समोर नमली होती आणि त्यांनी मुघलांना मुलगी देऊन सामंजस्याचे करार केलेले होते. मेडता आणि मेवाड, विशेषतः चित्तोर हे दोनच वंश असे होते की ज्यांनी मोगल राजांना आपल्या मुली देण्यास नकार दिला.
मेडता पासून सुमारे ९० कि.मी. अंतरावर नागौर किल्ला आहे. किल्ल्याचे मूळ नाव 'अहिछत्रगड' असे आहे. नागौर परिसराला महाभारत काळात जंगलदेश म्हणून संबोधले जायचे. अहिछत्रगढ ह्या नावाचा अर्थ 'नागफणीचा किल्ला' असा आहे. प्राचीन काळातील नागवंशी क्षत्रियांनी हा मूळ किल्ला बांधला होता.
१२ व्या शतकापासून नागौर किल्ला मुख्यत्वे मुस्लिमांच्या ताब्यात होता. सध्याचा किल्ला हे जाट मुघल वास्तुशास्त्राचे उदाहरण आहे. गेल्या ४० वर्षात गडावर जीर्णोद्धाराची अनेक कामे झाली आहेत. त्यामुळे आता किल्ला बऱ्याच चांगल्या स्थितीत आहे.
किल्ल्याचा परिसर विशाल आहे, जवळजवळ ३६ एकर परिसर आहे. ह्या परिसरात अनेक सुंदर ऐतिहासिक इमारती आहेत. अनेक चौक, बागा आणि कारंजी आहेत. आम्ही नोव्हेंबर २०१६ मध्ये नागौरला गेलो होतो, तेव्हा मात्र अनेक हौदातील पाणी आटलेले असल्यामुळे त्यात कारंजी उडत नव्हती!
काही इमारतींच्या भिंतींवर तर आहेतच पण छतावर देखील सुंदर पेंटिंग्ज आहेत. काही इमारती आणि अगदी काही स्नानगृहेसुद्धा आपल्याला किल्ल्याच्या शासकांच्या वैभवशाली जीवनशैलीच्या कहाण्या सांगतात!
नक्षीदार कमानी आणि जाळ्यांमुळे ह्या वस्तू वैशिष्ट्यपूर्ण आणि सुंदर दिसतात. सांस्कृतिक वारसा संवर्धन उत्तम प्रकारे करण्यासाठीचा युनेस्को पुरस्कार नागौर किल्ल्याला मिळालेला आहे.
नागौर शहरात सुफी संत ख्वाजा मोइनुद्दीन यांचे शिष्य वास्तव्य करीत होते आणि त्यातील एका प्रमुख शिष्याचा, हमीनूद्दीन चिस्ती ह्यांचा दर्गा अजूनही तेथे आहे. दरवर्षी जागतिक सूफी संगीत महोत्सव जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात नागौर किल्ल्यात भरतो.
नागौर येथून बिकानेर अंदाजे १२० कि.मी. अंतरावर आहे. एकदा तुम्ही राजस्थानात आलात की बरेच किल्ले आणि हवेल्या पाहायला मिळतात. राजस्थान शाकाहारी अन्नासाठी प्रसिद्ध आहे. शाकाहारी लोकांना इथे कोणतीही अडचण उद्भवणार नाही, त्यांना कुठेही सहज शाकाहारी भोजन मिळेल. मात्र भाज्या शिजवताना बरीच हॉटेल्स शुद्ध तूप वापरतात, म्हणून व्हीगन लोकांना त्याबद्दल विशेष चौकशी करावी लागेल. पण व्हीगन ग्राहकांसाठी ते तेलात केलेल्या भाज्या आणि काही पक्वान्नेदेखील नक्की बनवतील.
राजस्थानमध्ये बरीच चांगली हॉटेल्स आहेत. काही हवेल्या आणि राजवाडे हॉटेलमध्ये रुपांतरित केलेले आहेत. जर आपल्याला ऐतिहासिक काळाचा अनुभव घ्यायचा असेल तर आपण अशा हॉटेल्स मध्ये राहू शकता. आमच्या राजस्थान ट्रिपमध्ये आम्हाला अशा काही हॉटेल्समध्ये राहण्याची संधी मिळाली.
रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तर द्या, कारण सांगा.. आपण शाळेच्या प्रश्नपत्रिकेतील, ह्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचे नाव घेतले की आपल्याला आठवेल, भारतात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जागेबद्दल प्रश्न होता. उत्तर नक्कीच चेरापुंजी होते. चेरापुंजीला एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा गिनीज रेकॉर्ड आहे. जुलै 1861 मध्ये चेरापुंजीला एका महिन्यात 30.5 फूट पाऊस पडला!!!! ह्यामुळे चेरापुंजी गावाचे नाव - पृथ्वीवरील सर्वात जास्त ओली जागा असे पडले. परंतु सध्या सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे जवळचेच Mawsynram नावाचे गाव.
म्हणूनच आता हे ठिकाण सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणही नाही आणि त्या गावाचे आता चेरापूंजी असे नावदेखील नाही!! आता त्याला 'सोहरा' असे म्हणतात, जे खरे तर त्या गावाचे मूळ नाव आहे. मूळ नाव सोहरापूनजी होते, जे ब्रिटिश राज्यकर्ते उच्चारू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी त्याला चेरापुंजी म्हटले. या जागेचे मूळ नाव पुन्हा ठेवले जावे म्हणून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अनेक वर्षे स्थानिक लोकांना प्रयत्न करावे लागले. 2007 मध्ये मेघालय सरकारने ठरविले की आता ह्यापुढे या जागेचे नाव सोहरा असे असेल.
पर्वतरांगा, डोंगर, ढग, धुक्यामुळे आणि पावसामुळे ब्रिटीशांनी या जागेला 'पूर्वेचे स्कॉटलंड' म्हणून संबोधले आणि हे ठिकाण उत्तर-पूर्व भारतातील त्यांचे प्रशासकीय मुख्यालय बनविले. या प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी सर्वात वरची माती वाहून जाते आणि शेती करणे अवघड होते. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस असूनही, या प्रदेशात हिवाळा आणि उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागतो. अलीकडेच ही वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन, जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही जेव्हा सोहराला गेलो होतो, तेव्हा इतका पाऊस पडणाऱ्या शहरात सगळीकडे हिरवेगार असेल अशी आम्ही अपेक्षा केली होती. आमची निराशा झाली. शहरात सगळीकडे एकतर पिवळे सुकलेले गवत किंवा ओसाड जमीन होती. पण गावाच्या बाहेर, जवळपास मात्र घनदाट जंगले होती आणि त्यामुळे हिरवाई टिकून होती!! मेघालयातील रस्ते खूपच चांगल्या स्थितीत आहेत. सुंदर निसर्ग, ढग आणि उत्कृष्ट रस्ते यांच्यामुळे प्रवास अगदी आनंददायी झाला.
सोहराकडे जाताना आम्ही 'उमियम तलाव' पाहण्यासाठी गेलो. स्थानिक लोक त्याला 'बरापानी तलाव' म्हणतात. बरापानी म्हणजे बडा पानी.. भरपूर पाणी असे असेल का? मला माहित नाही.
हा तलाव गुवाहाटी ते सोहराकडे जाणार्या महामार्गाजवळ आहे आणि शिलाँगपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. हा जलाशय म्हणजे उमियाम नदीवर बांधलेल्या धरणामुळे बनलेला एक कृत्रिम तलाव आहे. साठविलेले पाणी जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी वापरले जाते. हा तलाव पर्यटकांसाठी मेघालयमधील एक मोठे आकर्षण आणि जल क्रीडा केंद्र आहे. नुसते तलावाभोवती आरामात फिरणे हे देखील खूप शांतवणारे आणि सुखद आहे. सततच्या आणि प्रदीर्घ प्रवासानंतर तर असे फिरणे विशेष आवश्यक आहे.
Umiam Lake 2.09p.m.
Umiam Lake 2.10 p.m.
Umiam Lake 2.10 p.m.
Umiam Lake 2.48p.m.
Umiam Lake 2.46 p.m.
Umiam Lake 2.44 p.m.
Umiam Lake 2.50 p.m.
तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्याच एका तळ्याची इतकी छायाचित्रे का दिली आहेत?!! इतकी सगळी छायाचित्रे दिली आहेत ते तुम्हाला मेघालय ह्या नावाला साजेसा मेघांचा-ढगांचा खेळ तिथे कसा अखंड चालू असतो ते लक्षात यावे म्हणून! अवघ्या काही मिनिटांच्या अवकाशाने सगळे चित्र अगदी बदलून जाते. केव्हा ढग येतील, केव्हा सूर्यकिरण दिसतील, कधी धुके असेल काहीच सांगता येत नाही. आपल्याला प्रकाश व सावलीचे नृत्य सतत बघायला मिळते.
मेघालय म्हणजे ढगांचे माहेरघर. ह्या राज्याचा भूभाग सगळा डोंगराळ प्रदेश आहे आणि देशात सर्वाधिक पाऊस जिथे पडतो असे हे राज्य आहे.
सोहराकडे जाताना लागते असे आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे 'हत्ती धबधबा, एलिफन्ट फॉल्स'. स्थानिक भाषेत त्याला तीन चरण किंवा तीन पायऱ्यांचा धबधबा म्हणत असत. पण सध्या प्रचलित आणि लोकप्रिय असलेले नाव एलिफंट फॉल्स आहे.
घनदाट हिरवेगार जंगल, थंड हवामान आणि झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे ह्या ठिकाणचे सौंदर्य वाढले आहे. धबधब्याच्या तळाशी जाण्यासाठी बर्याच पायऱ्या आहेत.
Elephant Falls 📷Wikimedia Commons
Elephant Falls
Elephant Falls
Elephant falls
In case you are wondering!!!
पायर्या चांगल्या बांधलेल्या आहेत आणि खाली उतरणे फार कठीण नाही. चढताना मात्र काही पायऱ्यांची उंची ज्येष्ठ नागरिकांना त्रास देऊ शकते. थोड्या थोड्या पायर्या झाल्या की बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत. तिकिट कार्यालयाजवळ, प्रवेशद्वाराशी सुखद थंडीत आवश्यक अशी गरमागरम चहा, स्नॅक्सची आणि हस्तकलेच्या वस्तू, शाली, स्टोल्स,स्वेटर्स विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. आपण तिथून काहीही न खरेदी करता परत आलात तर मग आपले नाव अनासक्त लोकांच्या यादीतच समाविष्ट करावे लागेल!!
मी केलेली खरेदी
मेघालयातील खासी डोंगराळ प्रदेशात, जिथे सोहरा आहे, तेथे बरीच पवित्र संरक्षित वने आहेत. महाराष्ट्रात देवराईची संकल्पना आहे तशीच काहीशी ही संकल्पना आहे. पूर्वापार चालत आलेल्या स्थानिक धार्मिक श्रद्धा आणि आता 2002 पासून अंमलात आलेल्या, वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे ही सर्व वने संरक्षित आहेत. ह्या पवित्र जंगलात काही मोनोलिथस/ दगडरूपी स्मारके देखील आहेत. कोणी म्हणतात की त्यांचा उपयोग प्राचीन काळी बलिवेदी म्हणून केला जात असे. काहीजण म्हणतात की ती सगळी पूर्वजांची स्मारके व आठवण आहेत.
The Sacred Groves 📷Wikimedia Commons
वेळेअभावी आम्ही ह्या देवराईंना, पवित्र जंगलांना भेट देऊ शकलो नाही. सोहरा प्राचीन गुहांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही त्यापैकी दोन गुहा बघू शकलो. पहिली गुहा 'अरवाह लुमश्यान' गुहा होती. ही एक अवश्य भेट द्यावी अशीच गुहा आहे. गुहांकडे जाण्याचा मार्ग फार सुंदर आहे. मेघालय शासनाने अतिशय निगा राखलेले आणि सुस्थितीत ठेवलेले असे हे ठिकाण आहे.
He must be tired..so taking rest!
Some distinguished visitors
गुहेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक छान उद्यान केलेले आहे. बसायला बाक आहेत, झोपाळा आहे. त्या उद्यानातून आजुबाजूच्या डोंगरदऱ्यांचे, घनदाट जंगलाचे विहंगम दृश्य दिसते.
आम्ही नंतर भेट दिली त्या mawsmai गुहेपेक्षा, ह्या Arwah गुहेत जाणे खूप सोपे होते. या अरवाह गुंफा मोलस्कच्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध आहेत. ते जीवाष्म प्रागैतिहासिक कालखंडातील आहेत, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 कोटी वर्षांपूर्वीचे! इतके पुरातन जीवाश्म पाहून खरोखर खूप आनंद झाला.
गुहेच्या छतावरून ओघळून आता खडक झालेले Stalactites आणि गुहेच्या जमिनीवर उभे असलेले Stalagmites गुहेच्या सौंदर्यात भर घालतात.
The entrance of the Arwah Lumshyanna caves
Stalactite
Stalactites
Fossils
Large portion with fossils
गुहेच्या आत एक लहानसा पाण्याचा प्रवाह वाहत आहे, त्यामुळे गुहेच्या जमिनीचा काही भाग थोडा निसरडा आहे. काही भागात गडद अंधार आहे. म्हणून सोबत एक शक्तिशाली टॉर्च अवश्य ठेवावा आणि योग्य, घट्ट पकड असलेले आरामदायक चपला/बूट घालावे. गुहेच्या सभोवतालची जागा ह्या व्हिडिओत दिसते आहे अशी आहे.
सोहरा धबधब्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक म्हणजे 'नोहकालिकाई धबधबा'. तो 1100 फूट उंचीवरून खाली पडतो. इतक्या उंचीवरून पडणारा जलप्रपात पाहणे हे पावसाळ्यात नक्कीच एक अद्भुत दृश्य असेल.
Nohkalikai Waterfall
आम्ही धबधबा पाहिला आणि अवघ्या पाच मिनिटात ती दरी संपूर्णपणे धुके आणि ढगांनी आच्छादली गेली. हे असे मेघालयात नेहमीच होते असे कळले. आम्ही सुदैवी म्हणून वेळेत पोचलो. नाहीतर इतक्या लांबून जाऊन धबधबा बघायला मिळाला नसता तर वाईट वाटले असते.
आम्ही सोहरा येथील 'रामकृष्ण मिशन स्कूल' कॅम्पसला भेट देऊ शकलो. ही जवळपास शंभर वर्षे जुनी संस्था असून इथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. येथे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्य विक्रीचे दुकान देखील आहे.
Beautiful old building
शाळेच्या खेळाच्या मैदानाजवळ एक मंदिर आणि प्रार्थना हॉल आहे. शाळेत नियमित शाळेव्यतिरिक्त संगणक प्रशिक्षण केंद्र, एक व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, गरजू मुलांसाठी गदाधर अभ्युदय प्रकल्पाचे संचालन देखील केले जाते. रामकृष्ण मिशन सेवाभावी वृत्तीने रुग्णालये तसेच मोबाइल मेडिकल व्हॅन चालवित आहे. रामकृष्ण मिशन खरोखरच त्या क्षेत्रात अतिशय स्तुत्य काम करत आहेत.
सोहरामध्ये आणखी एक प्रसिद्ध धबधबा आहे. नाव आहे 'सेवन सिस्टर्स धबधबा'. सुमारे हजार फुटांवरून पडणारा हा सात लहान धबधब्यांचा मिळून बनलेला धबधबा पावसाळ्यात नक्कीच सुंदर दिसत असणार.
Seven sisters waterfall in rainy season 📷Wikimedia Commons
सगळ्याच्या सगळ्या, सातही बहिणींना भेटता येईल इतके आम्ही सुदैवी नव्हतो. जेव्हा नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही सोहराला गेलो होतो तेव्हा ह्यातल्या काही धाकट्या बहिणी गायब होत्या, बहुतेक खेळायला गेल्या असणार!! मोठ्या दोघीतिघी बहिणी मात्र, असेल नसेल त्या शक्तीनिशी, अतिशय दक्षतेने मोर्चा सांभाळत होत्या!
Seven Sisters waterfall
असंख्य भूमिगत लेण्यांच्या चक्रव्यूहासाठी मेघालय प्रसिध्द आहे. बऱ्याच लेण्यात अद्याप कोणी गेलेले नाही, त्याविषयी संशोधन चालू आहे. भारतातील सर्वात लांब गुहा जंटीया टेकड्यांच्या भागात, मेघालयात आहे. तिची लांबी 31 किमी आहे, जी जगातील सर्वात लांब गुहांपैकी एक आहे.
सोहराजवळील 'Mawsmai' गुंफा ही एक भव्य गुहा आहे. शतकानुशतके जुनी अशी ही गुहा प्रचंड मोठ्या, अवाढव्य आणि चित्रविचित्र अशा Stalctites आणि Stalgmites नी भरलेली आहे. ह्या गुहेत चांगला उजेड आहे आणि म्हणून आपण निसर्गाचे हे सर्व चमत्कार पाहू शकतो.
गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता तसा सोपा आहे. थोड्या पायऱ्या आहेत. गुहेच्या आत काही जागा आहेत ज्या खरोखरच अतिशय अरुंद आहेत. तिथे आपल्याला अगदी कसे बसे अंग चोरून जाता येते. गुहेत अशाही काही जागा आहेत जिथे आपल्याला पुढे जाण्यासाठी जवळपास रांगत जावे लागते.
या सर्व कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोक आणि स्थूल लोकांना गुहेत आत जाणे कठीण आहे. त्यांनी जाऊ नये असेच मी सुचवेन. गुहेचा फक्त एक लहानसा भाग लोकांसाठी खुला आहे. पावसाळ्यात गुहेत पाणी भरते आणि त्यामुळे त्यावेळी लोकांना गुहेत जाण्याची परवानगी नाही.
ही चुनखडीची गुहा आपल्याला त्यातील नैसर्गिक रित्या तयार झालेल्या विविध आकृतींमुळे आश्चर्यचकित करते. लेण्या, धबधबे, ढग आणि घनदाट जंगले आणि चांगल्या स्वभावाचे लोक आणि हस्तकला - आणखी किती कारणे हवीत- मेघालयात जाण्याचे ठरवण्यासाठी?!!!
सोहरामध्ये बरीच रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. आम्ही आमच्या प्रवासाच्या दोन महिने आधी ओयोवर हॉटेल बुक केले होते. ओयोच्या ईशान्य हॉटेल्स असोसिएशनशी झालेल्या वादाला धन्यवाद!! कारण त्यामुळे ऐनवेळी तिथे गेल्यावर त्या हॉटेलने जागा दिली नाही आणि रात्रीच्या वेळी, रस्त्यांवर दिवे नसलेल्या एका नव्या गावात, पुन्हा हॉटेल शोधण्याचा थरार आम्हांला अनुभवता आला.
परंतु आमचा ड्रायव्हर खरोखर शांत आणि धीराचा होता. बरेच फिरल्यावर आणि नेटवर शोधल्यावर आम्हाला एक सुयोग्य हॉटेल मिळू शकले. हॉटेलचे नाव 'कोनिफेरस रिसॉर्ट' होते. नाव रिसॉर्ट असले तरी हॉटेलच आहे हे. जवळ एक लहानसा पाण्याचा प्रवाह, झरा वाहत होता. हॉटेलचे रेस्टॉरंट आम्ही गेलो तेव्हा ठीक ठीकच होते. मला वाटते त्यांचा नेहमीचा स्टाफ तेव्हा नव्हता. त्यामुळे गेलो त्या रात्री बाहेर जेवायला जायला लागले नाही इतकी सोय होण्यापूरेसाच आम्ही त्या रेस्टॉरंटचा लाभ घेतला.
Coniferous resort
Sunrise viewed from the balcony
सोहरा बघण्यासाठी, एकतर आपण शिलॉंगहून एक दिवसाची सहल करू शकता किंवा सोहरामध्ये राहू शकता. आम्ही दोन रात्री आणि दोन दिवस सोहरामध्ये थांबलो होतो.
सोहरा येथे शाकाहारी जेवणासाठी माझी शिफारस 'ऑरेंज रुट्स' हॉटेल असेल. ऑरेंज रूट्स ह्या नावाचे मूळ चेरापुंजी.. ऑरेंज ग्रोव्ह - संत्र्यांची बाग या शब्दात सापडते. रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ आहे, जेवण चवदार आहे आणि रेस्टॉरंटमधून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे!
View from the restaurant
जेवणाची अमर्यादित थाळी पण चांगली होती. पण दुर्दैवाने माझ्याकडे त्याचे फोटो नाहीत. बहुधा जेवण आल्यावर फोटो काढण्याइतका संयम उरला नसेल!!
सोहरामध्ये इतके सगळे बघण्याजोगे आहे, आनंद अनुभवण्याजोगे आहे. त्यामुळे शिलॉंग हुन एक दिवसाची ट्रिप घाईघाईत उरकू नये असेच मी सुचवेन. सोहरा मध्ये किमान दोन दिवस तरी राहायलाच हवे.