शनिवार, २५ जुलै, २०२०

Sok Dee (शुभेच्छा) लुआंग प्रबांग!

 लुआंग प्रबांग एकदम संथ, शांत जीवनशैलीचे शहर आहे. इथे आल्यावर तुम्हाला तर वाटेल की जणू तुम्ही 1970च्या दशकात आहात! जीवनाची संथ गती, कमी गर्दीचे रस्ते, वैभवशाली संस्कृती व स्थापत्य, वातावरणातील अध्यात्मिकता, सुस्वभावी लोक आणि नैसर्गिक सृष्टीसौंदर्य या सर्वांमुळे लुआंग प्रबांग अगदी अनोखे शहर वाटते. लुआंग प्रबांगच्या जुन्या शहर भागातून निवांत फेरफटका मारणे आम्हाला खूप आनंददायी वाटले. या भागातील इमारती आणि कॉफी शॉप्स पाहून लुआंग प्रबांग ही फ्रेंच वसाहत होती त्याची आठवण होते. 



luang prabang, laos, phabang, asia, mekong, city, town, countryside, landscape
लुआंग प्रबांग (From Pikist.com)

चुली वरचा स्वैपाक!

सुंदर मंदिरे

सजावट 

बौद्ध भिक्षु

फुलं घ्या फुलं ..देवासाठी फुलं!!


बौद्ध मंदिरे सगळीकडे, अगदी पावलोपावली दिसतात.


Wat Sensoukhram

एका मंदिरातील बुद्धाची सोनेरी मूर्ती

That Makmo - Watermelon Stupa

पूजाविधीतील एक भाग

धर्म समर्पित तरुण 

उच्च शिक्षण !! अभ्यास असा करायचा असतो!!!
उंच भिंतीवर बसून..म्हणजे ते उच्च शिक्षण होते !!!


मुळात लुआंग प्रबांग या नावाचा अर्थच मुळी रॉयल बुद्ध मूर्ती असा आहे. बौद्ध मंदिरे आणि बौद्ध भिक्षू ह्या शहराला एक वेगळीच शांतता प्रदान करतात.बौद्ध भिक्षूंनी शहरात हिंडून भिक्षा मागायची ही इथली जुनी पद्धत आहे. शंभराहून जास्त बौद्ध भिक्षु पहाटेच मंदिरातून दीक्षा मागण्यासाठी निघतात. त्यांच्या रस्त्यावर भाविक लोक आधीपासूनच भिक्षा घेऊन तयार असतात आणि फोटो काढायला पर्यटक पण तयार असतात. 


भिक्षाफेरी
(From Pixabay)

Haw Kham किंवा Ho Kham नावाचा राजप्रासाद आता वस्तु संग्रहालयात रुपांतरीत झालेला आहे. आवर्जून बघायलाच हवे असे हे ठिकाण आहे. इथे तुम्हाला लाओसच्या इतिहास आणि संस्कृती बद्दल खूप चांगली माहिती मिळेल. या आवारात अनेक राजेशाही इमारती आहेत, तसेच त्यांचे म्हणजे राजघराण्याचे वैयक्तिक वापराचे भाग देखील आहेत. जरी राजघराण्यातले लोक आता तिथे राहत नसतील तरी तो भाग, जणू काही ते तिथे राहातच असावेत, असाच ठेवलेला आहे. एका दारावर ऐरावत म्हणजे इंद्राचा हत्ती आणि इंद्र यांच्या मूर्ती दिसतील. एका शिल्पात महेंद्र पर्वत आणि गंगा पण दिसेल!


पूर्वी लाओस, कंबूज (आत्ताच्या कंबोडियातील अनेक शतकांपूर्वी असलेल्या) ह्या हिंदू साम्राज्याचा एक भाग होता. त्यामुळेच आपल्याला इथे अनेक हिंदू देवदेवतांची चित्रे दिसतील. तसेच अनेक संस्कृत नावे पण आढळतील उदाहरणार्थ जयवर्मन, हरिहरालय, श्रेष्ठपुरा, द्वारावती. लाओसमध्ये अजूनही आपल्याला भारतीय धर्म, कला, संस्कृती आणि वास्तुशास्त्र ह्यांची छाप दिसते.


Pra Lak Pra Ram हे लाओसचे राष्ट्रीय महाकाव्य आहे आणि ते वाल्मिकी रामायण वर आधारलेले आहे. इथेही जरी रामच नायक असला तरी लक्ष्मणाचे नाव आधी येते. त्यामागचे कारण असे की रामाला राजा म्हणून जे करणे आवश्यक होते ते त्याने केले पण लक्ष्मणाने मात्र स्वतःच्या इच्छेने त्याच्याबरोबर वनवास स्वीकारला तसेच आयुष्यभर त्याला साथ दिली. त्याबद्दल गौरव म्हणून लक्ष्मणाचे नाव आधी येते! या महाकाव्यात ते दोघं राजा Thattarathह्याचे पुत्र आहेत. ह्या काव्यात Nang Sida आहे,जिला लक्ष्मीचा अवतार मानले गेले आहे. इथे monkey Hanoumane आहे, जो त्यांना Sida चा शोध घ्यायला आणि युद्धातही मदत करतो. लाओसमध्ये लोक मानतात की रामायण हे जातक कथा आहे! Wat Mai Suwannaphumaham (Mai Souvana Phoun Ram) हे ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या एक अत्यंत महत्त्वाचे मंदिर आहे. कारण मधल्या अशांततेच्या काळात, दीर्घकाळ पर्यंत ह्या मंदिरात प्रबांगची मूर्ती राहिलेली होती आणि शिवाय त्यावेळी हे मंदिर राजघराण्याचे मंदिर म्हणून पण कार्यरत होते. इथे रामायण कथेतील चित्रे लाकडी भिंतींवर, सोनेरी पत्र्याच्या प्लेटिंगवर चित्रीत केलेली आहेत. हे नक्कीच लुआंग प्रबांग मधील चित्तवेधक मंदिर आहे आणि आणि त्यामुळे अर्थातच सर्वात जास्त लोक आणि प्रवासी ह्या मंदिरात जातात आणि फोटो काढतात.


सीता

राम, लक्ष्मण, सीता


राजवाड्याच्या परिसरात Haw Phra/Pra Bang याचे मंदिर आहे. ही तीच मूर्ती जिचे नाव शहराच्या नावा सारखेच आहे. लुआंग म्हणजे शाही आणि प्रबांग म्हणजे बुद्धाची सोनेरी मूर्ती. लाओसच्या इतिहासात या मूर्तीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे.


Haw Pra Bang

एकाग्रता !! देवळाच्या दुरुस्तीचे आणि सौन्दर्यीकरणाचे काम चालू होते.


रॉयल म्युझियम परिसरातील हॉल मध्ये होणारा सांस्कृतिक कार्यक्रम आवर्जून बघावा असाच आहे. इथे तुम्हाला लाओ संस्कृतीची एक झलक पाहायला मिळेल. या Royal Ballet theatre मध्ये बहुतेकदा Phra Lak Phra Lam ही नृत्यनाटिका चालू असते. ही माहिती वाचून तुम्हाला या नृत्यनाटिकेविषयी उत्सुकता वाटत असेल तर ह्यातील काही भाग तुम्ही युट्युब वर देखील बघू शकता.


Royal theatre cultural show

रोयल थियेटर, लुआंग प्रबांग


Pak Ou Caves 


चुनखडीच्या खडकात असलेल्या, एकावर एक अशा या दोन गुफा आहेत. लुआंग प्रबांगहुन इथे जाण्यासाठी मेकॉन्ग मधून बोटीने जायला लागते. या प्रवासात अत्यंत मनोहारी असे सृष्टीसौंदर्य बघायला मिळते.


या गुहांमध्ये बुद्धाच्या अक्षरशः हजारो मूर्ती ठेवलेल्या आहेत. ह्या गुहातून जलदेवतेचा वास आहे अशी स्थानिक लोकांची श्रद्धा आहे आणि त्यामुळे अनेक शतके, खरेतर जवळपास दोन हजार वर्षे हे एक पूजास्थान म्हणून मानले गेलेले आहे.


Pak Ou caves - मधून दिसणारी नदी

गुंफेकडे जाणारा मार्ग 

वरच्या गुंफेकडे जाण्याचा मार्ग 

काही छोटी गावे पारंपरिक लाओ पद्धतीच्या गावांप्रमाणे अजूनही ठेवलेली आहेत. पर्यटक त्यातील काही गावांना भेट देऊ शकतात. तिथे जाण्यासाठीही बोटीनेच जावे लागते.


बोटीसाठीचा पेट्रोल पंप!

राइस वाईन तयार होते आहे.

भाजलेली केळी 

जाता जाता खायला खाऊ!

केशरचना 

अर्थातच बाजारातून स्थानिक कलाकुसर खरेदी करण्यास तुम्ही विसरणार नाहीच! हातमागावर तयार केलेली वस्त्रप्रावरणे तसेच स्थानिक लोकांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तू या सगळ्यांनी बाजार ओसंडून वाहत असतो.

लुआंग प्रबांगच्या बाजारातून घेतलेली
 विणलेली सुंदर शाल 


Mount Phousi वर चढून संपूर्ण गावाचे मनोरम दृश्य पाहणे आणि अत्यंत सुंदर अशा Tat Kuang Si धबधब्यांना भेट देणे अजिबात विसरू नका. ही दोन्ही ठिकाणे बघायचे आमचे राहूनच गेले आहे.


Kuang Si waterfall
(from Pixabay)


आता नेहमीचे पर्यटकांचे प्रश्न

लुआंगप्रबंग स्वस्त आहे का? नाही, स्वस्त नाही. विशेष करून तुम्हाला हे रेस्टॉरंटमध्ये गेल्यावर लक्षात येईल! रस्त्यांवर खूप सगळे स्थानिक अन्न अगदी स्वस्तात विकायला असते. पण ते व्हिगन आहे का किंवा शाकाहारी आहे का हे तुम्हाला कळणार नाही. जर का नशिबाने एखादा दुकानदार तुम्हाला इंग्रजी बोलणारा भेटलाच तर तुम्हाला नक्कीच स्वस्त स्थानिक अन्न खाता येईल. पण नाही तर व्हिगन आणि शाकाहारी लोकांना विशेष रेस्टॉरंटमध्ये जायला लागेल.ती महाग जरूर आहेत पण तिथले अन्न मात्र अत्यंत चविष्ट आहे. आग्नेय आशियातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक असल्याने लुआंग प्रबांगला प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. लुआंग प्रबांग सुरक्षित आहे का? तुम्ही ऐकले असेल की लाओस हा जगातील सर्वात जास्त बॉम्ब टाकले गेलेला देश आहे. व्हिएतनाम युद्धाच्या वेळेला लाओसवर जबरदस्त बॉम्ब हल्ले झाले. किती बॉम्ब टाकलेले असतील? सरासरीच काढायची तर दर आठ मिनिटाला एक. आणि असे किती दिवस? तर दिवसाचे चोवीस तास, अशी नऊ वर्ष. त्यातले कित्येक न फुटलेले बॉम्ब अजूनही लाओस मध्ये सापडतात. शेतकऱ्यांना शेतीसाठी जमीन नांगरताना किंवा ग्रामीण भागातील मुलांना खेळताना ते बॉम्ब सापडतात आणि त्यांना काही कळायच्या आत ते बाँम्ब फुटून लोक जखमी होतात. मी वाचले आहे की अजूनही सरासरी लाओसमधील रोज एक माणूस ह्या बॉम्ब मुळे मरतो आहे. असेही म्हणतात कि लाओस पुन्हा पूर्णपणे सुरक्षित व्हायला, या बॉम्बच्या भीती तून मुक्त व्हायला अजून दोनशे वर्षे लागतील. दोन महासत्तांमध्ये झालेल्या शीत युद्धाचा एका तटस्थ देशावर झालेला हा महाभयंकर परिणाम आहे. पण अर्थातच तिथे पर्यटक म्हणून गेल्यावर तुम्ही अशा आडबाजूच्या जागांना जाणार नाही आणि त्यामुळेच लाओस आणि लुआंग प्रबांग हे प्रवाशांसाठी सुरक्षित आहे. आपल्या समृद्ध वास्तुशैलीच्या आणि कलात्मकतेच्या वारश्यामुळे लुआंग प्रबांग खूप विलक्षण शहर आहे. शहरात फ्रेंच वास्तुशैली आणि पारंपारिक लाओ वास्तुशैलीचा एक अनोखा संगम पाहायला मिळतो. हा सर्वच वारसा अतिशय चांगल्या तऱ्हेने जतन केला गेलेला असल्यामुळे, युनेस्कोने लुआंग प्रबांग ला विश्व वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

शुक्रवार, २४ जुलै, २०२०

Sai Bai Dee (नमस्कार) लुआंग प्रबांग!

 नुकतेच आपले माननीय पंतप्रधान मोदीजी यांचे लाओ PDR च्या पंतप्रधानांबरोबर covid-19 नंतरच्या काळातील जगा समोरील आरोग्य विषयक आणि आर्थिक आव्हाने याविषयी फोनवर संभाषण झाले. त्यावेळी लाओ PDR च्या विकास कार्यक्रमात असलेल्या भारताच्या सहभागाबद्दल लाओ PDR च्या पंतप्रधानांनी भारताला धन्यवाद दिले. Vat Phou हिंदू मंदिराच्या संरक्षण प्रकल्पात देखील भारताचा सक्रीय सहभाग आहे. हे एक पाचव्या किंवा सहाव्या शतकात बांधले गेलेले पुरातन शिवमंदिर आहे.


चीन आणि लाओस मधील रेल्वे मार्गाचे मेकोंग वरील लुआंग प्रबांग जवळील खांब बांधून पूर्ण झाले अशी बातमी जेव्हा एप्रिलमध्ये वाचली तेव्हापासून मला वाटायला लागले की लुआंग प्रबांग किती बदलेल या रेल्वे मार्गा मुळे आणि चीनच्या वाढत्या प्रभावामुळे! तर त्याच्या आधीच मी पूर्वी ते कसे होते त्याच्या विषयी लिहायला पाहिजे.


काय आहे लुआंग प्रबांग आणि कुठे आहे?


तर लुआंग प्रबांग हे लाओस मधील एक अत्यंत रमणीय असे शहर आहे. लाओस देश सर्व बाजूंनी जमिनीने आणि वेगवेगळ्या देशांना वेढला गेलेला आहे. जर का तुम्ही जगाचा नकाशा बघाल तर तुमच्या लक्षात येईल की लाओस च्या सगळ्या बाजूनी थायलंड, कंबोडिया, व्हिएतनाम, चायना असे देश त्याचे शेजारी आहेत आणि समुद्र किनारा न लाभलेला असा आग्नेय आशिया तील तो एकमेव देश आहे


भूमीने वेढलेला लाओस 
(छायाचित्र नेटवरून साभार )


आम्ही लुआंग प्रबांग ला डिसेंबर २०१२ मध्ये गेलो होतो. त्यावेळी लुआंग प्रबांग चा विमानतळ म्हणजे एक मोठा हॉल होता..बास! अगदी मोजक्या फ्लाइट्स.. माझ्या आठवणीप्रमाणे बॅंकॉक, चीअंग मई आणि सियम रिप हून तिथे जायच्या. पण तेव्हा तिथे विमानतळाच्या विस्ताराचे कामही चालू होते. मी तर पहिल्यांदा इतका लहान विमानतळ पाहिला होता आणि त्याच्यामुळे असेल, त्या वातावरणाला काहीतरी एक घरगुती स्पर्श होता आणि संपूर्ण वास्तव्यात तीच भावना मनात राहिली.


File:Luang Prabang Airport 2010.jpg
लुआंग प्रबांग विमानतळ, 2012
(विकीपीडिया वरून साभार)


विमानतळावर आम्हाला घ्यायला आमच्या हॉटेल ने गाडी व ड्रायव्हर पाठवलेला होता. तो आम्हाला त्या सुंदर शहरातुन घेऊन गेला आणि अचानक एका छोट्या गल्लीच्या जवळ गाडी थांबली. तिथे दुसरा माणूस आमची वाट पाहत होता. त्याने आमचे सामान उचलले आणि चालायला सुरवात केली. त्या गल्लीतून त्याच्या मागोमाग आम्ही चालू लागलो. तिथे रस्त्यावर लाईट नाही, पूर्ण अंधार, जवळपास कुठेही मला हॉटेलची इमारत काही दिसत नव्हती. आमचे सामान घेऊन चालणारा माणूस एका बांबूच्या पुलावरून खाली उतरायला लागला. खालती एक बोट आमची वाट पाहत होती आणि हे आमच्यासाठी खरोखरीच खूप मोठे आश्चर्य होते. मला अजून आठवतंय ते आश्चर्य, चंद्रप्रकाश आणि त्या शांत वातावरणात नदीच्या पाण्याचा बोटीमुळे होणारा आवाज.

पलीकडच्या किनार्‍यावर आम्हाला परत अनेक पायर्‍या चढायला लागल्या. जवळपास आम्ही दोन तीन मजले असावे इतकी उंची चढून गेलो. पण आताचा रस्ता हॉटेलचा असल्यामुळे सुंदर दिव्यांनी उजळलेला होता. याच्याइतका सुंदर प्रवास असूच शकत नाही.. अर्थात जेव्हा तुमचे सामान दुसरे कोणी वाहून नेत असेल तेव्हा!! नाहीतर इतकी उंच चढण होती ती. म्हणजे बाबा गाडी आणि व्हीलचेअर साठी तर त्या पायऱ्या अशक्यच. पण कोणी वयस्कर किंवा आजारी माणूस असेल तर त्याच्यासाठी पण खूप अवघड. आम्ही इथेच प्रवासातला एक मोठा धडा शिकलो. जेव्हा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करता तर तेव्हा साधारणपणे तुम्ही हॉटेल पासून त्या शहराच्या महत्त्वाच्या भागा पर्यंतचे अंतर ध्यानात घेऊन हॉटेलचं बुकिंग करता. पण तेवढे पाहणे पुरेसे नाही, तर वाटेत काही नद्या आणि डोंगर आहेत का हे पण बघायला पाहिजे!! हॉटेल खूप छान होते. लहानशा, दोन मजली, लाओ पद्धतीचे बांधकाम असलेल्या इमारती परिसरात विखुरलेल्या होत्या. नशिबाने आम्हाला वरच्या मजल्यावरची खोली मिळाली होती. कौलारू छपराची आणि बाल्कनी मधून खाली बघितल्यावर चाफ्याची झाडेच झाडे (लाओ भाषेमध्ये त्याला चंपा म्हणतात). शिवाय नदी दिसत होती, डोंगर दिसत होते आणि जेव्हा आम्ही पोचलो तेव्हा त्या वेळेला तर चंद्र प्रकाशाची जादू या पूर्ण आसमंतावर पसरलेली होती.


चाफा - चंपा 

डोक चंपा हे लाओस चे राष्ट्रीय फूल आहे आणि लाओ एअर लाईन चे चिन्ह पण. लाओ एअरलाईनच्या विमानांवर देखील हे फुल काढलेले असते.

लाओ एअर लाईन 


दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशात आम्हाला आमच्या परिसर जास्त चांगला पाहता आला. खूपच रमणीय परिसर होता. हॉटेलच्या नदीकाठी असलेल्या रेस्टॉरंट मध्येच आम्ही नाश्ता घेतला. तुम्हाला सांगते, त्यावेळेला मेकाॅंग अशी मळकट पिवळट मातकट रंगाची होती आणि आता मी मध्यंतरी वाचले की आता मेकॉंग चा रंग बदलून निळसर हिरवट झालेला आहे. मी असे ऐकले आहे मेकाॅंग ह्या नावाची उत्पत्ती मे+ नाम+ खोंग अशी आहे. मे म्हणजे आई, नाम म्हणजे पाणी आणि खोंग म्हणजे गंगा.


हॉटेलचे नदीतीरावरील रेस्टॉरंट 


ब्रेकफास्ट टेबल वरून दिसणारे दृश्य 

ब्रेकफास्ट

हॉटेल मधून दिसणारे एक गाव 

नजर जाईल तिकडे पाणी आणि डोंगर!

हॉटेल मधून दिसणारे विहंगम दृश्य 

सुख!

तर अशा रीतीने आम्ही लुआंग प्रबांग नावाच्या अत्यंत रमणीय शहरात पोचलो होतो. हे शहर अगदी आत्तापर्यंत म्हणजे १९७५ पर्यंत अनेक शतके देशाची राजधानी होते आणि युनेस्कोने त्याला विश्व वारसा शहर म्हणून घोषित केलेले आहे. या शहराच्या सगळ्या बाजूंनी डोंगररांगा आहेत. मेकोंग आणि नाम खम नदीच्या संगमावर असलेल्या एका थोड्या खोलगट भागात हे शहर वसलेले आहे. कसे होते लुआंग प्रबांग शहर? दुसऱ्या दिवशी आम्ही कुठे कुठे गेलो?? काय पाहिले? ते बघुयात उद्याच्या पोस्टमध्ये.

#serenedestination #vacation #SouthEastAsia #LaoAirlines #shorttrip

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...