शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

नुरानंग फॉल्स आणि तवांग बौद्ध मठ

 मागील पोस्टमध्ये आपण सेला आणि जसवंतगढ युद्ध स्मारकाला भेट दिली होती. युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर आम्ही तवांगकडे निघालो. जाताना वाटेत नुरानंग फॉल्सना भेट दिली. 

नुरानंग फॉल्स हे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्यात आहेत. त्यांना जंग फॉल्स किंवा बॉंग बॉंग फॉल्स असे देखील म्हणतात. जास्त लोकांना अजून हे ठिकाण माहिती नाही. त्यामुळे तिथे पर्यटकांची गर्दी नसते. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने इथे खूप शांतता आहे. धबधब्याच्या पडणाऱ्या पाण्याचाच काय तो आवाज!



नुरानंग फॉल्स


शंभर मीटरवरून पडणारा हा धबधबा खूपच छान दिसतो. पाण्याचा वेग, सर्वत्र उडणारे तुषार ह्या सौंदर्यामुळे काळे डोंगर आणि हिरव्या जंगलाच्या पार्श्वभूमीवर हा शुभ्र पांढरा धबधबा शोभून दिसतो. तुम्ही सुदैवी असाल तर तुम्हाला इंद्रधनुष्ये देखील दिसू शकतात. 

तिथेच एक छोटेसे जलविद्युत केंद्र आहे. मला वाटते की ह्या जलविद्युत केंद्रासाठीच तिथे येणारी पक्की सडक बांधली गेली असावी.



धबधब्यापर्यंत जाण्यासाठी एक पायवाट आहे. थोडी निसरडी असणारी ही पायवाट तुम्ही ट्रेकिंग साठी शिकलेली कौशल्ये वापरायची संधी देते! पण ह्या वाटेने गेलात तर तुम्ही अगदी तळाशी, म्हणजे जिथे धबधबा जमिनीवर पडून तवांग नदीला मिळतो तिथे पोचू शकता. 

तवांगपासून साधारण ४० किलोमीटर वर असणारे हे धबधबे पाहायला जरी जास्त पर्यटक येत नसले, तरी ते धबधबे सिनेमातून मात्र आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहेत. 

माधुरी दीक्षित च्या कोयला ह्या सिनेमातील एक गाणे इथे चित्रित झाले होते. लोक धडपडत त्या पायवाटेने अगदी खालपर्यंत जाण्याचे एक महत्वाचे कारण हे देखील आहे, की जिथे माधुरी दीक्षितचे फोटो निघाले अगदी तिथेच आपलेही फोटो असावे!! 

जरी तवांगपर्यंतचे अंतर फक्त चाळीस किलोमीटर असले तरी डोंगरदऱ्यांचा  रस्ता असल्याने पोचायला वेळ लागू शकतो. जाताना तुम्हाला उत्तर हिमालय पर्वतरांगा दिसत राहतात. 

तवांगमध्ये खूप लवकर सूर्य मावळतो आणि उगवतो. हवा अगदी थंड आहे. ऑक्सिजनचे प्रमाण कमी आहे. हवामानाची स्वतःला सवय होण्यासाठी थोडी विश्रांती आवश्यक आहे. मला वाटते तीन दिवस आणि तीन रात्री तुम्ही तवांगसाठी ठेवू शकलात तर उत्तम होईल. 

तुम्हांला सगळ्यांना हे माहितीच असेल की तवांग पश्चिम अरुणाचल प्रदेशमध्ये आहे. ह्या जिल्ह्याच्या सीमा चीन आणि भूतान ला टेकलेल्या आहेत. बर्फाच्छादित पर्वतशिखरे, स्फटिकशुभ्र पाण्याची किंवा बर्फाची असंख्य 
तळी, विरळ लोकवस्ती, लहान लहान गावे आणि सौहार्दपूर्ण लोक ह्या सगळ्यामुळे पर्यटन स्थळांच्या यादीत तवांग अगदी वरची जागा पटकावून बसले आहे. खासकरून तवांग मध्ये तुम्हाला निसर्गाचे सौंदर्य आणि धार्मिक शिकवणुकीचा महिमा अनुभवता येतो.

दुसऱ्या दिवशी आम्ही अशा जागेला भेट दिली ज्या जागेमुळे शहराला आणि जिल्ह्याला तवांग हे नाव मिळाले आहे. शहरापासून साधारण २ किलोमीटर अंतरावर असलेला हा बौद्ध मठ, भारतातील सर्वात जुना व सर्वात मोठा मठ आहे. जगात तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. जगातला सर्वात मोठा बौद्ध मठ ल्हासा, तिबेट येथे आहे. 

तवांग ह्या नावाची उत्पत्ती अशी आहे, त+ वांग. त म्हणजे घोडा आणि वांग म्हणजे निवडलेला. घोड्याने निवडलेली जागा ती तवांग. कथा सांगते की एक लामा, बौद्ध मठ स्थापन करण्यासाठी जागा शोधत होता. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून तो खूप फिरला. पण मठाला हवी तशी जागा काही मिळाली नाही. शेवटी त्याने ठरवले की आपण ध्यान लावून ईश्वराचे काही मार्गदर्शन मिळते का पाहू या. 

त्याने ध्यान लावून झाल्यावर डोळे उघडले तर त्याचा घोडा गायब झाला होता. लगोलग त्याने घोडा शोधायला सुरुवात केली. खूप वेळ शोधल्यावर अखेर घोडा एका थोड्या सपाट अशा डोंगरमाथ्यावर सापडला. हा ईश्वराचा संदेश आहे असे मानून घोडा जिथे सापडला त्या जागी मठाची स्थापना  करण्यात आली. अशा प्रकारे मेरा लामा लॉरडे गाईतसो ह्यांनी १६८१ मध्ये हा मठ स्थापन केला. 
 
ह्या मठाला ग्यालडेन नामगे लहात्से असेही म्हणतात. त्याचा अर्थ आहे, स्वच्छ रात्री दिसणारे स्वर्गीय नंदनवन. तवांगला येताना हिमालयाच्या वळणा वळणाच्या रस्त्यावरून तुम्हाला अधून मधून हा मठ दिसत राहतो. त्याच्या पिवळ्या छपरांवर सूर्याची किरणे पडतात तेव्हा तो विशेष चमकतो. हा मठ इतका भव्य आहे की पर्वताच्या पार्श्वभूमीवर दूरवरून तो दिसतोच दिसतो. 


तवांग मठ


हा मठ एखाद्या किल्ल्यासारखाच बांधला आहे. त्यात भिक्षु, विद्यार्थी ह्यांची निवासस्थाने, वाचनालय, संग्रहालय, मंदिर सर्व आहे. तो अशा मोक्याच्या ठिकाणी आहे जिथे पश्चिम कामेंग, तिबेट आणि भूतान येथून येणारे मार्ग एकत्र येतात.

तवांग मध्ये तुम्हाला तिबेटचा खूप प्रभाव पाहायला मिळतो. तिबेट मधील सर्वोच्च धार्मिक स्थानी असणारे दलाई लामा (चौदावे ) ह्यांना चीनने तिबेटवर कब्जा केला आणि अतोनात छळ करायला सुरुवात केली म्हणून, तिबेट सोडून निर्वासित होऊन, १९५९ मध्ये भारतात आश्रय घ्यायला लागला. सध्या ते उत्तर भारतात धरमशाला ह्या गावी राहतात. ते अनेकदा तवांग ला भेट देतात. तेव्हा तेव्हा त्यांची भेट ही जगातील अनेक वृत्तपत्रांची बातमी बनते. त्याचे कारण आहे चीन ची ह्याविषयातील नाराजी आणि तवांग च्या बाबत भारत चीन संबंधात आलेला तणाव.


प्रवेशद्वार 


वाचनालय - Centre for Buddhist Cultural Studies


मंदिर आणि शाळेकडे जाणारा रस्ता 





आम्हाला तिथे खूप शेळ्या आणि मेंढ्या बघता आल्या. बहुधा शेळीच्या दुधापासून काहीतरी पदार्थ तयार करण्याचा प्रकल्प पण मठाच्या आवारात असावा. 


आवारातील इमारती


शाळेची इमारत

शिक्षण आणि व्हिटॅमिन D!



अजून एक वर्ग 


अनेक लहान लहान भिक्षु तिथे शिकत आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीतील जे काय मला समजले ते असे, प्रत्येक बौद्ध घरातील एक तरी मुलगा ह्या शाळेत शिक्षण घ्यायला पाठवला जातोच. 
जपचक्रे 



अशी चक्रे परिसरात अनेक ठिकाणी आहेत. 
📷 Pradnya Sathe

मंदिरात बुद्धाची एक खूप उंच मूर्ती, तसेच इतर अनेक लहान मूर्ती, चित्रे, लेखन, पूजेचे साहित्य, नैवेद्य हे सगळे पाहायला मिळते. हे मंदिर खूप रंगीबेरंगी दिसते. 


८ मीटर उंच बुद्ध मूर्ती


मंदिरातील अजून एक मूर्ती 


आवारात अजून पण काही मंदिरे, प्रार्थना सभागृहे आहेत. इथे तुम्ही पूजेसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू तसेच दाखवले जाणारे नैवेद्य बघू शकता.

पूजा आणि नैवेद्य 

आम्हाला एका हॉलमध्ये मंत्रांचे पठण ऐकायला मिळाले. खूपच खास होती ती सगळीच प्रक्रिया. तुमच्यासाठी इथे व्हिडिओत दाखवते. 



आवारात एक संग्रहालय आहे. तिथे अत्यंत प्राचीन अशी कागदपत्रे, वस्तू, ऐतिहासिक तसेच धार्मिक महत्वाचे संदर्भ बघायला मिळतात. प्राण्यांपासून बनवल्या गेलेल्या काही विचित्र वस्तू पण बघायला मिळतात. तिथे जरी गाईड सेवा उपलब्ध नसली तरी सर्व नावे रोमन लिपीत लिहिलेली आहेत.

तवांग मध्ये अजून पण खूप आहे बघण्याजोगे. स्थानिक लोक ज्याला 'बिग बुद्धा टेम्पल' म्हणतात ते आहे. तवांग युद्ध स्मारक तर चुकवून चालणारच नाही. तिथे संध्याकाळी एक ध्वनिप्रकाश कार्यक्रम पण असतो. एक दिवस बुमला पास ला जायला राखून ठेवायला हवा. इथे फक्त भारतीय नागरिकच जाऊ शकतात, ते देखील विशेष परवानगी घेऊन. पुढच्या पोस्ट मध्ये मी ह्या सगळ्याबद्दल नक्की लिहिणार आहे. 

ह्या पोस्टचा समारोप करते आहे, तवांग महोत्सवाच्या वर्णनाने. आम्हाला अगदी अनपेक्षितपणे हा वार्षिक महोत्सव बघायला मिळाला. तिथे स्थानिक संगीत, नृत्य, नाट्य, तसेच देशभरातील नामवंत म्युझिक बँड्स असे सगळे बघायला, ऐकायला मिळते. कार्यक्रम एका मोठ्या मैदानात असतो आणि सगळ्यांसाठी मोफत असतो. स्टेडियम सारखी बसण्याची व्यवस्था, हिंडायला भरपूर जागा असलेला हा महोत्सव असतो. तुम्हाला स्थानिक जीवनाची इथे ओळख होऊ शकते. 


तवांग महोत्सव

तवांग महोत्सव


तवांग महोत्सवाला जाण्यासाठी पर्यटक जसे उत्सुक असतात तसेच स्थानिक लोक देखील ह्या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात. आम्ही ज्या हॉटेल मध्ये उतरलो होतो तिथला कर्मचारीवर्ग देखील महोत्सवाला जाण्यासाठी उत्सुक होता!

त्या मैदानात हस्तकला, स्थानिक झाडे, खाद्यपदार्थ ह्यांचे देखील स्टॉल्स होते. तुम्ही इथे स्थानिक खास पदार्थ खाऊ शकता. मला तिथे दरवळत असलेला भाजल्या जाणारा मांसाचा वास अजिबातच सहन झाला नाही. 

अरुणाचल मधील खाद्यपदार्थ आणि त्यात वापरले जाणारे घटक ह्यात खूपच वैविध्य आहे. मला स्थानिक स्टॉल्स वर जिथे, घटक काय आहेत हे नीट कळू शकणार नाहीत, तिथे खायची हिंमत झाली नाही!! तुम्ही जिथे उतरला आहात त्या हॉटेलच्या रेस्टॉरंट मध्ये शाकाहारी अन्न बनवून घेणे हाच अरुणाचल मध्ये उत्तम पर्याय आहे!!

#PlacesToSeeNearTawang #TawangFestival #TawangMuseum #WhatYouShouldKnowBeforeVisitingTawang 


शुक्रवार, २० नोव्हेंबर, २०२०

से ला आणि जसवंतगढ युद्ध स्मारक

 गेल्या पोस्टमध्ये, आपण होतो दिरांग ला! तिथला सुप्रसिद्ध, सुंदर सूर्योदय देखील आपण पाहिला होता. निसर्गरम्य दिरांग शहराच्या सौंदर्यामुळे आमच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या आणि आम्ही उत्सुकतेने से ला पास दिसण्याची वाट पाहत होतो.

तिबेटियन भाषेत ला म्हणजे पास. त्यामुळे खरे तर नुसते से ला म्हणणे पुरेसे आहे! मात्र ह्याचा उल्लेख सर्वत्र से ला पास असाच केलेला आढळतो. 


अरुणाचल मधील वाहन जाण्याजोग्या सर्वात उंच रस्त्यांपैकी हा एक रस्ता असल्याने, तुमचा प्रवास खूपच रोमहर्षक होतो. तवांग ला बाकी भारताशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने संरक्षणाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता खूपच महत्वाचा आहे. 

 समुद्रसपाटीपासून अंदाजे 13,700 फूट उंचीवर, आपण अरुणाचलच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग आणि तवांग दरम्यानच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडतो. हवामान थंड असले आणि बर्‍याच वेळा रस्ता बर्फाच्छादित असला तरी बीआरओ (सीमा रस्ता संस्था) हा रस्ता प्रवासासाठी खुला राहील यासाठी खूप प्रयत्न करते. वर्षाकाठी, फक्त काही वेळा, तुफान बर्फवृष्टीमुळे, मुसळधार पाऊस पडल्याने किंवा दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद होतो.परंतु रहदारीसाठी रस्ता खुला व्हावा म्हणून दुरुस्त करण्यासाठी बीआरओ सर्व प्रयत्न अगदी त्वरित करते . 



से ला पासला जाताना चारदर तवंग रस्ता 

हा रस्ता एनएच 13 चा एक भाग आहे आणि मला तो तुम्हाला Google नकाशात दाखवायला आवडेल. म्हणजे तो रस्ता कसा आहे हे आपल्याला कोणतेही वर्णन न लिहितासुद्धा नीटच कळेल!





भारत सरकारने तवांग पर्यंत एक बोगद्यातून रस्ता तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला असून, तो २०२२ मध्ये पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. यामुळे प्रवासाचे अंतर कमी होईल व वेळेची बचत होईल. हा बोगदा पूर्ण झाल्यावर, तो रस्ता पाऊस आला, बर्फ पडला तरी वर्षभर सुरु राहील आणि तवांगशी सतत संपर्कात राहता येईल. 

जेव्हा भूभाग खूपच कठीण आणि दऱ्याखोऱ्यानी बनलेला असेल तेव्हा रस्ते तयार करणे सोपे काम नाही. से ला तलावाजवळील से ला स्मारक, आपल्याला रस्ते तयार करताना आलेल्या अडचणी, त्या साठी धारातीर्थी पडलेले शिपाई याबद्दल सांगते.






इथे आहे अरुणाचल प्रदेश मधील सर्वात सुंदर तलावांपैकी एक तलाव- से ला तलाव. 



ह्या भागातील हवामान खूप चटकन बदलते. अगदी काही मिनिटांतच आधी राखाडी दिसणारे आकाश निळे दिसू लागले. 


अप्रतिम दृश्य
📷 Girish Tilak 

तिथे हवा खूपच थंड होती. जमिनीवर, कानाकोपर्‍यात, सांदीसपाटीत थोडा थोडा बर्फ दिसत होता. तसेच डोंगराच्या शिखरावर बर्फ पसरलेला होता. अगदी पाण्यातही तरंगांचा होणारा बर्फ आणि बर्फाचे तरंग दिसत होते. 

बर्फाचे तरंग

📷 Girish Tilak 



अनिवार्य फोटो!
📷Girish Tilak

ह्या फोटोतल्या स्मितहास्यावर जाऊ नका. हे फक्त फोटोपुरते आहे! हवा खूप थंड होती. अंगात हुडहुडी भरत होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण खूप कमी असल्याचे श्वास घेताना जाणवत होते. 

📷 Girish Tilak 


तलावाभोवती चालण्यासाठी चांगला रस्ता केलेला आहे. पण इतक्या थंड हवेत कोणाचीच त्या रस्त्यावरून जाण्याची हिंमत होत नव्हती!!

या फोटोमध्ये आपण बर्फाच्छादित पर्वत शिखरे आणि वळणा वळणाचे रस्ते पाहू शकता.




 या तलावाचे, ह्या भागातील बौद्ध लोकांसाठी, लामांसाठी खूपच आध्यात्मिक महत्व आहे. दलाई लामा यांनी बर्‍याचदा या ठिकाणाला भेट दिली आहे. आमच्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितले की या भागात 101 लहानमोठे तलाव आहेत.

 जेव्हा आपण या प्रदेशात प्रवास करतो, तेव्हा नक्कीच असे वाटते की 'शांग्री ला' खरोखर अस्तित्त्वात असल्यास, ते खरंच, इथेच असेल. 

आता आम्ही जसवंतगढ युद्ध स्मारकाकडे निघालो होतो. ही शौर्य व पराक्रमाची कहाणी सांगणारी जागा आहे. 

चौथी तुकडी, गढवाल रायफल्सचा रायफलमन जसवंसिंग रावत हे १९६२ च्या भारत चीन युद्धात नुरानंग येथे तैनात होते. गढवाल रायफल बटालियनने चिनी सैनिकांशी जोरदार लढाई केली. त्यांच्या आक्रमणांना उत्तर दिले. परंतु प्रतिकूल परिस्थितीमुळे बटालियनला माघार घ्यावी लागली.

त्यावेळी जसवंतसिंगने आपल्या दोन अन्य सैनिक साथीदारांसह ह्या चौकीवर तळ ठोकला. चिनी सैनिकांवर गोळीबार करत राहिले. त्यामुळे माघार घेणाऱ्या बटालियनला, दुसर्‍या तळावर सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी वेळ मिळाला.
 
दुसर्‍या दिवशी त्याचे दोन साथीदार देखील युद्धात मरण पावले, पण असे म्हणतात की जसवंतसिंग एकट्याने ७२ तास ही चौकी सांभाळत होते. चिनी सैन्याला त्यांनी रोखून ठेवले होते. 

आक्रमक चिनी सैन्याने 17 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांना ताब्यात घेऊन ठार केले. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना महावीर चक्र देण्यात आले. गोष्ट इथेच संपत नाही. जसवंतसिंग असे एकमेव सैनिक आहेत जे मृत्यू नंतरही भारतीय सशस्त्र सेनेच्या सेवेत होते.

ते सेवेत असते तर जशी बढती मिळाली असती, तशी अगदी नियमित बढती त्यांना देण्यात आली. त्यांचे सामानदेखील इथे ठेवले आहे. त्यांच्या बुटांना दररोज पॉलिश केले जाते. 2002 मध्ये ते कॅप्टन म्हणून निवृत्त झाले.

 हा शूर देशभक्त मृत्यू नंतरही आपल्या राष्ट्राची सेवा करत राहिला आणि त्या भागात तैनात असलेल्या सैनिकांना ते अजूनही धोक्यांची सूचना देतात, वेगवेगळ्या प्रकारे मदत करतात असे म्हटले जाते. 

 



स्मृतिस्थळ 

जसवंतसिंग स्मारक

जसवंतसिंगांना रोज लागतील अशा सगळ्या वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. युनिफॉर्मला रोज इस्त्री होते, बुटांनादेखील रोज पॉलिश होते. 


 



या स्मारकावर लष्करी अधिकारी तैनात आहेत. ह्या स्मृतिस्थळाला ते 'बाबा का मंदिर' असे म्हणतात. त्यावेळी ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने आम्हाला सांगितले की येथे तैनात असलेले अधिकारी व इतर कर्मचारी मांस, मासे इत्यादी पदार्थ खात नाहीत. इथे असताना पूर्णपणे शाकाहारच घेतात. .

दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात, एक पूजा होते आणि स्मारकात एक कार्यक्रम आयोजित केला जातो. ऑक्टोबर २०१९ च्या शेवटी आम्ही जसवंत गडला भेट दिली तेव्हा ही जागा वार्षिक समारंभासाठी सज्ज होत होती.

एक छोटेसे संग्रहालय आहे जिथे बंकर उभे केले आहेत. ते पाहून आलेल्या पर्यटकांना सैनिक कसे जगतात हे समजते. 
 



 जेव्हा आपण इथे उभे राहून, लष्करी अधिकाऱ्यांकडून, युद्धाबद्दल ऐकतो तेव्हा आपल्या सैनिकांच्या खडतर आयुष्याची आणि कष्टांची तीव्र जाणीव होते. त्यांना प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागतो, आपल्या कुटूंबापासून दूर रहावे लागते आणि समाज त्यांच्या ह्या त्यागाची जाणीव क्वचितच ठेवतो. इथून निघताना मनातील, आपल्या देशाच्या सैनिकांविषयीचा आदर, सन्मान आणि अभिमान जास्तच तीव्र झालेला असतो.

जवळच एक लहान रेस्टॉरंट आहे. ते लष्कराने चालवलेले आहे. येथे तुम्ही ताजे बनविलेले, गरमगरम, नाश्त्याचे पदार्थ आणि काही केक्स, डोनट्स इत्यादी खाऊ शकता. इथे मिळणारे उत्पन्न जसवंतगडच्या देखभालीसाठी वापरले जाते.

इथे आपण चवदार स्नॅक्स खाऊ शकता, त्याबरोबर मोफत दिला जाणारा गरम गरम चहा, हवा तेवढा पिऊ शकता आणि तवांगच्या प्रवासासाठी स्वत: ला तयार करू शकता!

#IndiaChinaWarMemorial #MustVisitPlaceInArunachal #SelaIconicPlace #101LakesNearTawang #BeautifulLakeNearTawang  #JasawantSinghRawat #72Hours 
#ThingsToKnowBeforeEnteringArunachalPradesh








 



गुरुवार, १२ नोव्हेंबर, २०२०

दिरांग, अरुणाचल प्रदेश - एक निसर्गसुंदर गाव .

  काही ठिकाणे खरे तर फार सुंदर असतात. पण ती एखाद्या मोठ्या पर्यटन स्थळाच्या जवळ असतील तर मग लोक त्या ठिकाणांकडे एका रात्रीचा थांबा म्हणूनच पाहतात. त्या मोठ्या स्थळांच्या कीर्तीमुळे ही लहान पण सुंदर असलेली स्थळे झाकोळून जातात. दिरांग हे असेच एक ठिकाण आहे. तिथे बरेच पर्यटक जातात, पण ते फक्त तवांग ला जाताना प्रवास खूप अवघड आणि लांबचा आहे, म्हणून विश्रांतीसाठी, एक रात्र मुक्काम करायला प्रवासी दिरांग ला थांबतात. काहीजण तिथे थांबतात ते तवांगला जाण्याआधी, इतक्या उंचीवर असलेल्या हवेची, कमी ऑक्सिजन ची, थंडीची शरीराला सवय व्हावी म्हणून.

थंड तवांग च्या तुलनेत जे समुद्रसपाटीपासून ३०४८मीटर उंचीवर आहे, दिरांग चे हवामान प्रसन्न आणि सुसह्य आहे. दिरांग समुद्रसपाटीपासून १५६० मीटर उंचीवर आहे. दिरांग पासून तवांगपर्यंतचे अंतर फक्त १३० किलोमीटर आहे. पण सगळा रस्ता पर्वतांतून जाणारा आहे. त्यामुळे कधी कधी गाडीत बसल्या बसल्या रोलर कोस्टर राईडचा आनंद आणि थरार पण अनुभवता येतो. जर का तुम्ही सुदैवी असाल, हवामानाची तुम्हाला साथ असेल तर मग फक्त चार तासांत देखील हे १३० किलोमीटर अंतर पार करता येते. पण कधी जर का बर्फवृष्टी, ढगफुटी किंवा दरड कोसळण्याचा प्रसंग घडलेला असेल तर मात्र हिमालयाच्या संगतीत तुम्हाला अनेक तास काढण्याची संधी मिळते!! 

आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की दिरांग अरुणाचल प्रदेश मध्ये आहे. अरुणाचल प्रदेश - ज्या पर्वतांवर सूर्य सर्वात आधी उगवतो असे पर्वत असलेली भूमी. अरुणाचल भारताची फळबाग म्हणून पण ओळखले जाते. तसेच जीव वैविध्यासाठी देखील अरुणाचल प्रसिद्ध आहे. अनेक प्रकारचे पक्षी, प्राणी अरुणाचल मध्ये आढळतात. 

दिरांग मध्ये देखील ही सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत. स्वच्छ निळे आकाश, शुद्ध मोकळी हवा. प्रदूषण अगदी कमी आणि हे केवळ आकडेवारीत नाही, तर तुम्हाला प्रत्यक्ष देखील लगेच जाणवते. 

आमचा दिरांग ला पोचण्या आधीच्या दिवशी खूप प्रवास झाला होता. गोहाटीपासून ते बोमडीला पर्यंतचा प्रवास आम्ही केला. त्यातला बराच भाग रस्ते चांगले आहेत. पण नंतर मात्र रस्ते चांगले असले तरी डोंगर, दऱ्या, वळणे असा प्रवास असल्याने वेळ लागतो. आम्ही बोमडीला येथे रात्री राहिलो आणि बोमडीला परतीच्या प्रवासात बघण्याचे ठरवून सकाळी दिरांग ला जाण्यासाठी निघालो. 

बोमडीला -दिरांग हा प्रवास साधारण दोन तासांचा आहे. रस्ताभर हिमालयाच्या पर्वतरांगा दिसत राहतात. सगळी शिखरे पांढऱ्या ढगांनी वेढलेली असल्याने बर्फ कोणता आणि ढग कोणते ते समजतच नाही!


हिमालय पर्वतरांगा 

मला माहिती होते की अरुणाचल प्रदेशातील सर्वात उंच शिखर गोरीचेन आहे. त्यामुळे रस्त्यात कोणतेही उंच शिखर दिसले की मला वाटायचे की गोरीचेन दिसले! जरी गोरी चेन नसले तरी तुम्ही वरच्या फोटोत बर्फाच्छादित शिखर पाहू शकता. 

नंतर मला कळले की त्या जिल्ह्यातील सर्वात उंच शिखर कामते आहे. झाले.. त्या नंतर दिसणारे प्रत्येक उंच शिखर कामते वाटायला लागले!! 

अरुणाचल प्रदेशचे पहाटे उजळणारे पर्वत किंवा उगवणारा सूर्य ज्या पर्वतांवर सर्वप्रथम दिसतो अशा पर्वतांचा प्रदेश हे नाव सार्थ आहे. अरुणाचल प्रदेशामध्ये सूर्य खरोखरच लवकर उगवतो आणि संध्याकाळी सात वाजता पार रात्र झालेली असते. अर्थात भारताचा अवाढव्य भूभाग आणि त्या सर्वांची मिळून एकच भारतीय प्रमाण वेळ असल्याने आपल्याला लवकर आणि उशिरा वाटते. 

ह्या संपूर्ण प्रवासात तुम्ही वाहनाच्या आत बघूच शकत नाही. पूर्ण वेळ तुमचे डोळे खिडकीबाहेर खिळलेले असतात. हिमालयाची सूर्याच्या किरणांनी चमचमणारी शिखरे हे तर अविस्मरणीय दृश्य आहे. कधी कधी भीतीदायक दरी, कधी कधी खाच खळगे आणि तीव्र वळणे असलेला असा हा प्रवास.. पण हे सगळे असले तरीही अद्भुत सुंदर आणि अवर्णनीय असाच आहे. 
 

बर्फाच्छादित शिखर


अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग हे लहानसे शहर, खरे तर गाव आहे. कामेंग नदीच्या तीरांजवळ हे गाव वसलेले आहे.

गावाची झलक


दिरांग मधील भेट देण्याजोगी ठिकाणे म्हणजे कालचक्र गोम्पा हा पाचशे वर्षे जुना बौद्ध मठ, दिरांग झोन्ग हे जुन्या किल्ल्याचे अवशेष आणि गरम पाण्याचे झरे ही ठिकाणे आहेत. त्यातील दिरांग झोन्ग मध्ये आता निवासी भाग आहे. तिथे आता लोकांची घरे आहेत. 


दिरांग झोन्ग 
📷Girish Tilak

आम्ही ही सगळी पर्यटन स्थळे टाळायचे ठरवले. त्या ऐवजी आम्ही LDL बौद्ध मठ आणि सांगती व्हॅली ला जायचे ठरवले. ह्या दोन्ही ठिकाणी, त्या वेळी, आमच्या खेरीज क्वचितच कोणी आलेले होते. आम्ही ह्या ठिकाणांचे सौंदर्य आणि शांती मनसोक्त उपभोगली. 

 

जर का कोणाच्या लक्षात आले नाही तर!!



प्रवेशद्वाराच्या पुढचा रस्ता थोडा चढणीचा आहे. जरी चढाचे अंतर फार नसले तरी विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन ह्यामुळे असे वाटते की आपण एखादी टेकडी चढून गेलो आहोत!!



चढणीचा रस्ता


ही खरोखरच खूप शांत निवांत जागा आहे. नवीन बांधकाम आहे. खूप चांगल्या प्रकारे निगा राखलेली बाग आणि इमारत पाहून सुद्धा खूप ऊर्जादायी वाटते. 

जेव्हा आम्ही गेलो, तेव्हा मठात कोणीच नव्हते. फक्त माळी होता. त्यांनी आनंदाने फोटोसाठी पोज दिली.



हे बघा, आम्ही अशी पोज देतो!



काम चालू आहे!


काम चालू आहे!!


बागेची पण खूप सुंदर निगा राखलेली आहे. संपूर्ण परिसरात अजिबात कचरा नव्हता, अगदी कागदाचा एखादा कपटाही नाही. थोड्या वेळाने तिथे दोन महिला आल्या. त्यांच्याशी बोलल्यावर कळले की  रोज पूजेसाठी आणि प्रार्थनेसाठी तिथे परिसरातले लोक येऊन जातात.

 निळेशार आकाश, शुभ्र पांढरे ढग, सभोवतालचे डोंगर, जागेतील प्रगाढ शांतता आणि बुद्ध मूर्ती हे सगळे ह्या जागेला एक अध्यात्मिक व्यक्तिमत्व प्रदान करते. ह्या ठिकाणी, अगदी तुम्ही इकडे तिकडे भटकत असलात तरी तुम्हाला आपण ध्यान साधना करत आहोत असेच वाटते. त्या शांततेला, आपल्या बोलण्याने धक्का लावू नये असे वाटते. 

 

LDL मठ 
📷Girish Tilak


मठाचा परिसर 


ओम मणी पद्मे हं!


अजून एका वेगळ्या बाजूने फोटो 

सुंदर बाग 

हा फोटो म्हणजे माझे मागच्या वर्षीचे दिवाळी शुभेच्छापत्र होते. कारण मागच्या वर्षी दिवाळीत आम्ही ह्या ठिकाणी होतो. दिवस होता, २८ ऑक्टोबर २०१९. 




 नव्याने रंग दिलेला असल्याने मठ अगदी चमकत होता. मठाच्या आतल्या भागाचा मी फोटो काढला नाही. आत खूप शांतता होती. सर्व काही जाणणाऱ्या बुद्धाचा पुतळा होता. पूजा, प्रार्थनेसाठी, ध्यान धारणेसाठी फारच उत्तम जागा आहे. 

किती सुंदर दिवस! स्वच्छ निळ्या आकाशाचा!!

 मी मध्यंतरी एक वाक्य वाचले होते, "स्वच्छ निळे आकाश पाहून जर का तुम्हाला खूप आनंद होत असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. तुमचा आत्मा अजून जिवंत आहे!!!" अरुणाचल प्रदेश ह्या अर्थाने, तुमच्या आत्म्याला जागे करणारा प्रदेश आहे. 

दिरांग मध्ये अजून एक दडलेले रत्न आहे, ते म्हणजे सांगती व्हॅली. सुदैवाने अजून ते पर्यटन स्थळ बनलेले नाही. फार लोकांना माहिती नाही त्यामुळे त्या ठिकाणाची शांतता आणि नैसर्गिक सौंदर्य अबाधित राहिलेले आहे. सांगती व्हॅली ट्रेकर्स आणि कॅम्पर्स ना चांगली माहिती आहे. पण मला भीती वाटते, की अजून काही वर्षांनी ही जागा जेव्हा सर्व पर्यटकांना माहिती होईल, तेव्हा तिथे भरपूर गर्दी व्हायला सुरुवात होईल आणि तिथल्या नैसर्गिक सौंदर्याला धक्का लागेल. 

सगळ्या बाजूनी हिमालयाच्या पर्वतरांगा, शेजारून वाहणारी स्वच्छ नितळ पाण्याची नदी हे सगळे तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाते. 

सांगती व्हॅली दिरांग पासून साधारण १५ किलोमीटर वर आहे. रस्ता निसर्गसुंदर आहे. जाताना अनेक फळबागा दिसतात. तुम्ही जर का योग्य मौसमात तिथे असाल आणि सुदैवी असाल तर किवीज, संत्री,सफरचंदे ही फळे देखील लगडलेली पाहायला मिळतील. 

रस्त्यांवर, पुलांवर, जिकडेतिकडे तुम्हाला रंगीबेरंगी पताकांच्या माळा वाऱ्याबरोबर झुलताना दिसतील. सगळे दृश्य त्या झुलणाऱ्या पताकांनी अगदी जिवंत होऊन जाते. त्यावर बहुधा काही मंत्र लिहिलेले असावेत. बारीक अक्षरात खूप मजकूर लिहिलेला दिसतो. 

रस्त्याने दिसलेली घरे छोटी आणि डोंगर उतारावर बांधलेली होती. त्यामुळे खूपदा रस्त्यावर असलेला भाग हा दुसरा मजला होता आणि पहिला मजला अगदी नदीच्या शेजारी!! प्रत्येक घराच्या छतावर काही भाज्या वाळवत ठेवलेल्या होत्या. हिवाळ्याची बेगमी करत असावेत. मक्याच्या कणसांच्या दोरीने केलेल्या माळा वाळवण्यासाठी, खिडक्यांना किंवा छताला लटकवलेल्या दिसल्या. छतांवर भले मोठे भोपळे देखील उन्हात पहुडलेले होते. हो, आणखी एक गोष्ट दिसते ती म्हणजे मिरच्या पण वाळत ठेवलेल्या असतात. बहुधा अरुणाचल प्रदेशाच्या सुप्रसिद्ध भूत जोलोकिया मिरच्या असाव्यात. 

प्रत्येक घरासमोर, किंवा खिडकीत किंवा छतावर रंगीबेरंगी फुलांच्या कुंड्या ठेवलेल्या असतात. तुम्हाला कोणी भेटले तर ताबडतोब स्मितहास्य करतात आणि तुमच्याशी बोलायला तयार असतात. मवाळ आणि सुस्वभावी लोक वाटले.


पूल आणि पताका!



स्वच्छ नितळ नदी, पर्वत रांगा आणि पताका 



फळबाग मालकाचे घर 

तुम्ही फोटो काढायचे थांबूच शकत नाही. 



किवीज 


भोपळे!


मिरच्या, बहुतेक भूत जोलोकिया

आम्हाला एक स्थानिक घर बघता आले. पुढच्या मोसमात ते लोकांना होम स्टे उपलब्ध करवून द्यायचा विचार करीत होते. त्या साठी त्यांची तयारी चालू होती. 
 

स्थानिक घर.

हा होम स्टे नक्कीच खूप छान असणार आहे. नदी आणि डोंगराच्या इतक्या जवळ राहणे किती आनंदाचे असेल! तिथे मला अजून एक खास गोष्ट पाहायला मिळाली. जे काय घर मालकिणीने सांगितलेले मला समजले त्यावरून, सीवीड वाळवत होते. वर्षभराच्या साठवणीचे काम चालू होते. 


प्रसन्न घरमालकीण


सी वीड


हा संपूर्ण परिसर पर्यटनासाठी अजून तयार होतो आहे. तोपर्यंत, जर तुम्हाला अत्याधुनिक सुविधा हव्या असतील, तर अरुणाचल तुमच्यासाठी नाही. हॉटेल्स मध्ये लिफ्ट्स नाहीत, रेस्टॉरंट्स अगदी साधी आहेत, रस्ते कुठे कुठे अगदी खाच खळग्यांचे असतील. जिथे तुम्ही राहत असाल त्या हॉटेलमध्ये तुम्ही आधी सांगितलेत तर तुम्हाला साधे पण ताजे बनवलेले आणि सुग्रास शाकाहारी अन्न मिळू शकते. बाहेर शाकाहारी अन्न मिळणे थोडे त्रासाचे होऊ शकते. 

आम्हाला पर्यटकांचा एक गट भेटला, ते सगळे ह्या सगळ्या गोष्टींमुळे वैतागलेले होते. जिथे तुम्ही ट्रीप ला जाण्याचा विचार करीत आहात, तिथला नीट अभ्यास करा. आपल्या अपेक्षा त्याप्रमाणे ठेवा असेच मी सांगेन!! अरुणाचल तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, अत्याधुनिक सोयी सुविधांसाठी नाही, इतके लक्षात ठेवा. 

आणि हे सगळे सांगून झाल्यानंतर, मी पुन्हा पुन्हा प्रत्येकाला अरुणाचलला भेट द्यावी असेच सुचवेन, अरुणाचल ला भेट द्या, भारतीय निसर्गाचे वैभव बघा. भारतातील विविधता बघा. 

आता आपल्यासमोर येत आहे, अरुणाचल चा सुप्रसिद्ध सूर्योदय! 




अरुणोदय झाला!!
📷Pradnya Sathe









भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...