शनिवार, २९ ऑगस्ट, २०२०

एका दिवसात बुसान!

 बुसान बघताना सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जरी स्पेलिंग Busan असे असले तरी त्याचा उच्चार पुसान असा होतो! पुसान हे दक्षिण कोरियामधील एक अत्यंत प्रगत आणि प्रभावी शहर आहे. इथे होणारे विविध फेस्टिवल्स आणि कॉन्फेरन्सेस ह्यासाठी पुसान प्रसिद्ध आहे. आशियामधील #MICE ( meetings, incentives, Conferences and exhibitions) हब सिटी होण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. तुम्हाला २००२ चे आशियाई खेळ स्पर्धा आणि फिफा विश्वचषक आठवत असेलच. पुसान मध्ये दर वर्षी, वर्षभर वेगवेगळे फेस्टिवल्स आयोजित केले जात असतात. पुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आशियामध्ये मानाचे स्थान आहे. 

पुसान हे दक्षिण कोरियामधील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होणारे बंदर आहे. जगातील कोणत्याही आधुनिक आणि प्रगत शहरात असतील त्या सर्व व्यवस्था आणि सुविधा इथे उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती आणि चमत्कार दाखवणारे उड्डाण पूल आणि उंचच उंच इमारती विपुल प्रमाणात दिसतात. 

आम्ही दक्षिण कोरियातील ज्येजू बेटावरून पुसानला जाण्यासाठी सकाळचे विमान पकडले. आधीच आरक्षित केलेली टॅक्सी पुसान विमानतळावर आमची वाट पाहत होती. आम्हाला दिवसभरात कुठे कुठे जायचे आहे ते आम्ही टॅक्सी ड्रायव्हरला सांगितले व कोणत्या क्रमानुसार पाहायचे ते त्याला ठरवू दिले!

 विमानतळावरून आम्ही गेलो #Songdo बीचवर. पुसानचे बीचेस फार सुंदर आहेत. तिथल्या केबल कार स्टेशनवरून आम्हाला #Amnam पार्क ला जाण्यासाठी केबल कार घ्यायची होती. जाताना रस्त्यात आम्हाला जुन्या पुसान शहराची झलक बघायला मिळाली. 

आम्ही काचेचा तळ असणाऱ्या केबल कार चे तिकीट काढले. त्या पारदर्शक तळातून दिसणारा समुद्र, भोवतीचे डोंगर, लहान लहान बेटे, पाईन वृक्ष ह्या साऱ्यामुळे तो प्रवास कायम लक्षात राहण्याइतका सुंदर झाला. 

तिथे तिकिटासोबत तुम्हाला चक्क लॉलीपॉप देतात! केबल कारच्या प्रवासात हवेच्या दाबामुळे त्रास होऊ नये म्हणून असेल!

केबल कार

 
केबल कार मधून दिसणारे दृश्य 

Amnam पार्क ला उतरल्यावर खूप वेगवेगळी दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत. लोकांचे आवडते पर्यटन स्थळ असल्याने गर्दी असते. आम्ही एप्रिल २०१९ मध्ये गेलो होतो, तेव्हा तिथे डायनोसार विषयी एक प्रदर्शन चालू होते. खूप शाळांच्या सहली तिथे आलेल्या होत्या. त्या विद्यार्थ्यांचा चिवचिवाट आणि उत्साह सगळीकडे पसरलेला होता.

मला त्या डोंगरमाथ्यावर जावेसे वाटत होते. तो सुंदर रस्ता आणि त्याच्या दोन्ही बाजूला, तसेच डोंगराच्या उतारावर गच्च गर्दी करून उभे असलेले पाईन वृक्ष मला बोलावत होते. 

 

डोंगरमाथ्यावर जाणारा रस्ता

उंच चढाचे लाकडी जिने 


वरून पाहिल्यावर अगदी ३६० अंशातून पुसान पाहता येते. पण सर्वात चांगली जागा ह्या लोकांनी पटकावली होती!

Prime जागी चालू असलेला खेळ (Prime स्पोर्ट्स )

विहंगम दृश्य


परतीचा प्रवास केबल कारमधून दिसणारे दृश्य 


आम्ही #Happycow.net वर पुसान मधील विगन रेस्टॉरंट्स शोधून ठेवली होती. त्यातल्या #VegeNarang ह्या शुद्ध शाकाहारी विगन रेस्टॉरंट मध्ये जेवणासाठी जायचे ठरवले. ९व्या मजल्यावर असलेल्या ह्या रेस्टॉरंट मधून समुद्र फार सुंदर दिसतो. अन्न तर इतके चविष्ट की तुम्ही खातच राहता. अर्थात नंतरच्या गोड पक्वान्नांसाठी पोटात जागा ठेवलीच होती आम्ही!

Vege Narang - all Vegan Restaurant

 सुग्रास जेवणानंतर आम्ही गेलो, Hwangnyeongsan नावाच्या डोंगरावर. वळणा वळणांचा रस्ता आणि सगळीकडे चेरी ब्लॉसम ची झाडे! आम्ही पुसान ला एप्रिलच्या मध्यावर गेलो होतो. तिथला चेरी ब्लॉसम चा सिझन तर संपला होता. काही काहीच झाडांवर फुले उरली होती. पण फुलांचा ऋतू ऐन भरात असताना ते दृश्य कसे दिसत असेल, ह्याची आम्ही कल्पना करू शकलो. फुललेल्या चेरी ब्लॉसम्सनी आच्छादलेला डोंगर.. स्वप्न सत्यात येणेच जणू!
 
Cherry Blossom

गाडीने वर पोचल्यावर फारच सुंदर दृश्य दिसते. तुम्ही आणखी थोड्या पायऱ्या चढून वर गेलात तर तुम्ही 'बिकन फायर स्टेशन' ला जाता. तिथून दिसणारे डोंगर, झाडे, समुद्र, उड्डाणपुलाचे जाळे, अवाढव्य इमारती..सारेच दीर्घकाळ लक्षात राहण्याजोगे.

Hwangnyeongsan Mountain
Beacon Fire Station mound


उंचावरून दिसणारे पुसान 

नैसर्गिक सौंदर्य तसेच तंत्रज्ञानातील प्रगती अनुभवून झाल्यानंतर आम्हाला जायचे होते एका ऐतिहासिक तसेच अध्यात्मिक महत्वाच्या ठिकाणी, Haedong Yonggungsa येथे. हे साधारण ६०० वर्षे जुने बुद्ध मंदिर आहे. काळाच्या ओघात, विविध कारणांनी आत्तापर्यंत अनेकदा उध्वस्त झाले, परत परत बांधले गेले. कितीदा नावेही बदलली गेली. मंदिराचा परिसर भव्य आहे. एका बाजूला डोंगर आणि एका बाजूला समुद्र असणारे हे दक्षिण कोरियातील एकमेव मंदिर आहे असे सांगितले जाते. 

Haedong Yonggungsa Temple.

लोकांच्या कल्याणासाठी, भरभराट व्हावी म्हणून हे मंदिर बांधले गेले. दोन्ही बाजूला सुंदर दगडी कंदील असलेल्या रस्त्याने शंभर एक पायऱ्या गेलात की तुम्ही मुख्य मंदिराशी पोचता. 

मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता 

मुख्य मंदिराकडे जाण्याचा रस्ता

मंदिराच्या समोर एक उंच पॅगोडा आहे. मंदिराच्या मागच्या बाजूने आणखी काही पायऱ्या चढून गेल्यावर गॉडेस ऑफ मर्सी - दया देवतेचा पुतळा आहे. हा शुभ्र पुतळा खूप लांबवरून दिसत राहतो. 
ह्या मंदिराबद्दल अनेक कहाण्या ऐकायला मिळतात. मला खरे तर अधिकृत मार्गदर्शकाकडून ह्या मंदिराची माहिती जाणून घ्यायला आवडले असते, पण तशी काही सोय उपलब्ध नव्हती. 

मंदिराच्या आतील परिसर 

शैक्षणिक यशासाठी पूजिल्या जाणाऱ्या बुद्धमूर्ती 


मुख्य मंदिराचा गाभारा 

गाभाऱ्यासमोरील ओम

अजून एक मंदिर आणि ओम 
पॅगोडा च्या मागील भागात असलेल्या भव्य दगडी घंटांसारख्या रचना बघून, इंडोनेशियातील बोरोबुदूर येथील पुरातन बौद्ध मंदिरांची आठवण होते. 

पॅगोडाच्या मागे असलेल्या दगडी घंटासारख्या रचना 

आमचा तो दिवस खूप लवकर सुरु झाला होता ज्येजू बेटावर. त्या दिवसात विमान, कार, केबल कार प्रवास झाला. शेकडो पायऱ्या चढलो उतरलो. चविष्ट अन्नाने पोट आणि सुंदर दृश्यांनी मन तृप्त झाले होते. आता त्या दिवसाचा कळसाध्याय देखील साजेसाच हवा होता. तसा तो झाला Haeundae बीच वरील फेरफटक्याने!
हा दक्षिण कोरियातील सर्वात प्रसिद्ध व एका अर्थी जगप्रसिद्ध बीच आमच्या हॉटेलपासून चालत अगदी पाच मिनिटांच्या अंतरावर होता. लांब रुंद किनारा लाभलेला आणि रुपेरी वाळूचा हा बीच स्थानिकांचा आणि पर्यटकांचा अत्यंत आवडता आहे. पुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील काही कार्यक्रम इथे होतात. तसेच इतरही अनेक महोत्सव इथे साजरे होतात.

लोकप्रिय आणि सुप्रसिद्ध!!

मावळत्या सूर्याचे किरण उंच उंच इमारतींच्या काचेत प्रतिबिंबित होत होते. लाटांची गाज किनाऱ्यावर खेळणाऱ्या मुलांच्या किलबिलाटात मिसळत होती. रात्र किनाऱ्यावर उतरली होती. जोपर्यंत थंडी सहन होण्या इतपत होती तोपर्यंत आम्ही किनाऱ्यावर रेंगाळत होतो. नंतर हॉटेलमध्ये परतलो, ते दुसऱ्या दिवशी पहाटे भेटण्याचे वचन समुद्राला देऊनच! 



#BusanInternationalFilmFestival #SouthKorea #MICE #Asiangames2002 #FIFAworldcup #Sakura #ilovecherryblossom #CherryBlossomInKorea #OneDayInBusan
 

रविवार, २३ ऑगस्ट, २०२०

शिवसुताय नमोनमः - गणेश व शिव मंदिर, प्रम्बनन, इंडोनेशिया

  सध्या सर्वत्र साजऱ्या होत असलेल्या, माझ्या आवडत्या गणेशउत्सवात मनात काय येत असेल, तर फक्त गणपती! मग विचार केला तुम्हाला पण एका गणपती मंदिरातच का नको घेऊन जायला? चला तर मग!

File:Prambanan-ganesha.jpg - Wikimedia Commons
गणेश मूर्ती- ९ वे शतक- प्रम्बनन, इंडोनेशिया 
📷 आंतरजाल 


हे मंदिर बांधले गेले आहे ९व्या शतकात आणि मी ह्या मंदिराला भेट दिली होती १३ वर्षांपूर्वी - २००७ मध्ये. हे बहुतेक सर्वात मोठे शिवमंदिर असू शकेल. 
हे मंदिर आहे इंडोनेशिया मध्ये, योग्यकर्ता किंवा जोगजकार्ता जवळ. असे म्हणतात की योग्यकर्ता हे नाव आले भारतातल्या अयोध्येमुळे. लक्षात घेण्याजोगी गोष्ट आहे. त्या काळी श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येचे किती आकर्षण जगभर होते! इंडोनेशिया मध्ये योग्यकर्ता आहे, थायलंड मध्ये अयुत्थ्या आहे. 
योग्यकर्तापासून जवळपास २० किलोमीटरवर हा हिंदू मंदिरांचा प्रचंड समूह आहे, नाव आहे प्रम्बनन. 


File:Indonesia regions map.png - Wikimedia Commons
इंडोनेशियाच्या नकाशात प्रम्बनन. 
📷 आंतरजाल 

रकाई पिकतान नावाच्या हिंदू संजय राजवटीच्या राजाने पहिले मंदिर बांधायला सुरुवात करून नवव्या शतकाच्या मध्यात पूर्ण केले. ह्या समूहातील बाकी मंदिरांची भर घातली ती राजा लोकपाल आणि बळीतुंग महा संभू नावाच्या मातरम राज्यातील राजांनी.
३० स्क्वेअर किलोमीटरच्या भव्य परिसरात हा मंदिर समूह आहे. मूळ नाव आहे शिवगृह -शिवाचे घर किंवा शिवालय -शिवाचे वसतिस्थान, राज्य. 


कॅण्डी- बहासा इंडोनेशिया मध्ये -मंदिर 

जेव्हा तुम्ही ह्या मंदिर समूहात प्रवेश करता किंवा खरे तर काही अंतरावरूनच ह्या मंदिरांचे उंचच उंच, निमुळते कळस तुम्हाला दिसू लागतात. ते दृश्य इतके सुंदर आणि संस्मरणीय आहे की आयुष्यभरात तुम्ही विसरू शकणार नाही. मला नेहमी वाटते की प्रम्बनन हा शब्द संस्कृत ब्रम्हानंद ( परम आनंद) ह्या शब्दाचे रूप असेल!

पहिली झलक

तुम्ही आवारात प्रवेश करताच तुम्हाला ब्रम्हा, विष्णू, शिव मंदिरांचे कळस दिसतातच पण सगळीकडे दगडांचे ढिगारेच्या ढिगारेदेखील दिसतात. कोसळलेल्या मंदिरांचे हे दगड आहेत. 

File:Yogyakarta Indonesia Prambanan-temple-complex-06.jpg ...
प्रम्बनन मंदिर समूह 
📷 आंतरजाल 

ह्या मंदिर समूहाला वेढणारी एक भिंत आणि आवार होते जे आता नाही. त्या भिंतीच्या आत पूर्वी एकूण २४० मंदिरे होती. त्यातील २२४ मध्यभागात होती. ही मंदिरे समकेंद्री चौकोनात बांधली गेलेली आहेत. त्यांना म्हणतात कॅण्डी पेरवारा ( प्रवर असणार). मध्यभागी जात जात ही संख्या कमी कमी होत जाते. ६८, ६०,५२, ४४ अशी ही समकेंद्री मंदिरांची रचना आहे. 

File:Prambanan Temple Compound Map en.svg
मंदिर समूहाचा नकाशा 
📷 आंतरजाल 

दुर्दैवाने ह्या भागातली बरीच मंदिरे कोसळलेली आहेत. नुसते दगडाचे ढिगारे उरलेले आहेत. आम्ही प्रम्बननला जून २००७ मध्ये गेलो होतो. त्या आधी २००६ मध्ये इंडोनेशियाला एक मोठा भुकंप, तीव्र धक्का देऊन गेला होता. त्यामुळे ह्यातील बरीच मंदिरे पडली होती. 

ढासळलेली मंदिरे

सर्वात आतल्या भागात आहेत उत्पत्ती, स्थिती आणि लय ह्यांच्या देवांची, ब्रम्हा, विष्णू आणि महेश ह्यांची मंदिरे. ह्या शिवाय त्या तिघांच्या वाहनांची, अनुक्रमे हंस, गरुड आणि नंदीची पण मंदिरे आहेत. 

मंदिर समूहाचा मध्य भाग

शिवमंदिर सर्वात उंच म्हणजे १५४ फूट उंच आहे आणि सर्वात जास्त कोरीवकाम केलेले आहे. त्यात चार मूर्ती आहेत. शंकर गुरुरूपात आहे, शिवपत्नी पार्वती आहे, मुलगा गणेश आहे आणि अगस्त्य ऋषी अशा चार मूर्ती आहेत. आम्ही २००७ मध्ये गेलो, तेव्हा तिथे दुरुस्तीचे काम चालू असल्याने आम्हाला मंदिरात आत, गर्भगृहात जाता आले नाही, दिलेले माहितीपत्रक बघून समाधान मानावे लागले. 

शिव मंदिरातील मूर्ती 
 
त्रिमूर्ती मंदिरांच्या भिंतींवर रामायण आणि महाभारत कथा शिल्पकृतींद्वारे चित्रित केली आहे. आम्ही मंदिराच्या गर्भगृहात जाऊ शकलो नाही तरी ही शिल्पे मात्र पाहू शकलो.

भिंतींवरील कोरीव काम 
 

बारीक कलाकुसरीची भित्तीशिल्पे 

कोरीवकाम 

प्रम्बनन मंदिरे 

प्रम्बनन मंदिरे 

ह्या मंदिरांचे स्थापत्य, उत्तुंग उंची, भव्य आवार, अप्रतिम भौमितिक रचना, ज्या उत्साहाने हे प्रचंड बांधकाम केले गेले ते, ह्या सगळ्या गोष्टी तेव्हाही म्हणजे नवव्या शतकात देखील मानववंश किती प्रगत होता हेच दाखवते. 
मला तर वाटते, प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी प्रम्बनन मंदिरे बघायलाच हवीत. ती पाहून इंडोनेशियातील ज्या हिंदू राजांनी हे भव्य स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणले त्यांच्या विषयी प्रचंड आदर वाटतो. 


अच्छा प्रम्बनन मंदिरांनो - तुम्ही अलौकिक आहेत! 


ता. क. 
१. काही लोकांच्या मते प्रम्बनन हा शब्द परब्रह्म या संस्कृत शब्दावरून आला आहे. परब्रम्ह याचा अर्थ आहे सर्वोच्च तत्व, सर्वोच्च सत्य.
२. प्रम्बनन येथे सापडलेल्या शिलालेखानुसार या मंदिराची प्राणप्रतिष्ठा 12 नोव्हेंबर 856मध्ये झाली होती
३. आता नोव्हेंबर 2019 मध्ये म्हणजे त्याच्या उद्घाटना पासून ११६३ वर्षांनी तिथे पूजा, अभिषेक आणि प्रार्थना असा तीन दिवसांचा कार्यक्रम करण्यात आला. हे सगळे पूजा विधी तिथे सापडलेल्या हस्तलिखितानुसार केलेले होते
४. तुम्हाला प्रम्बननचे चांगले फोटो घ्यायचे असतील तर कृपया दिवसा उजेडी प्रम्बननची भेट ठरवा. जर का योग्यकर्ता ला राहत असाल तर तिथून सकाळी लवकर निघा आणि प्रम्बननला भेट द्या. 
५. तिथे प्रांगणात संध्याकाळी रामायणावर आधारित नृत्यनाट्य सादर होत असते.


शनिवार, १५ ऑगस्ट, २०२०

भारताचा सीमावर्ती भाग

 आज १५ ऑगस्ट, भारताचा स्वातंत्र्यदिन!! 




भारताच्या दक्षिणेकडे हिंदी (हिंद) महासागर, नैवृत्त्येला अरब समुद्र (सिंधुसागर) आणि आग्नेयेला बंगालचा उपसागर असे जलखंड आहेत. उर्वरित भूभागावर पाकिस्तान, अफगाणिस्थान, चीन, नेपाळ, भूतान, बांगलादेश, ब्रम्हदेश हे देश आपल्या सीमेवर आहेत. इंडोनेशिया आणि थायलंड बरोबर आपल्या काही सागरी सीमा जोडलेल्या आहेत. आज मी तुम्हाला काही सीमावर्ती भागात घेऊन जाणार आहे. 

भारत आणि शेजारी देश 
📷 Wikimedia Commons 

भारत आणि बंगला देश जवळ जवळ ४००० किलोमीटर च्या सीमेने जोडलेले आहेत. जगातील सर्वात मोठ्या पहिल्या पाच सीमारेषांपैकी ही एक आहे. इतकी मोठी सीमारेषा असणे स्वाभाविकच आहे, कारण १९४७ पर्यंत बंगला देश हा भारताचाच भाग होता. भारताचा नकाशा पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल, की कशी आणि किती सीमारेषा पसरलेली आहे. आसाम, त्रिपुरा, मेघालय, मिझोराम आणि पश्चिम बंगाल ह्या राज्यातून ही सीमारेषा जाते. इतकी मोठी, ४००० किलोमीटर पेक्षाही जास्त सीमारेषा असल्याने, तिकडून येणारे निर्वासित लोंढे थोपवणे, भारतासाठी फार अवघड झाले आहे. निर्वासित बांगला देशातून भारतात येत राहतात. 

नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही जेव्हा मेघालयात गेलो होतो तेव्हा आम्हाला दावकी (Dawki) ची उमंगोत (Umngot) नदी बघायला जायचे होते. आसामातील काझीरंगाहुन आम्ही सकाळी लवकरच निघालो. वाटेत एका शुद्ध शाकाहारी रेस्टॉरंट मध्ये नाश्त्यासाठी थांबलो.
.
KBR शाकाहारी रेस्टॉरंट 


 KBR च्या बाहेर! 

आम्ही दावकीला साधारण ११ च्या सुमारास पोचलो. तिथले रस्ते अगदी अरुंद. त्यात पर्यटकांची वाहने आणि सैन्याची वाहने रस्ता कायम गजबजलेला आणि वाहतूक तुंबलेली ठेवतात!

गाडी पार्क केल्यावर एक जिना उतरलात की तुम्हाला बोटिंग च्या ठिकणी जाता येते. तिथे बोटिंग करणे हा एक अत्यंत अविस्मरणीय अनुभव आहे. नदीचे पाणी इतके स्वच्छ आणि नितळ आहे की तुम्ही खरोखर तळ बघू शकता. 


बोटीतून घेतलेला फोटो -नितळ पाणी 

तुम्ही गुगल किंवा इंस्टाग्राम वर शोधलेत तर तुम्हाला दावकी आणि उमंगोतचे सुंदर सुंदर फोटो बघायला मिळतील! बोटिंग करताना तुम्हाला दावकीचा सुप्रसिद्ध पूल देखील दिसतो. 

दावकीचा सुप्रसिद्ध सस्पेन्शन पूल 


सस्पेंशन पूल



 निवांत गप्पा!

तुम्ही जेव्हा सैर संपवून काठावर परत येता तेव्हा एक मोठेच आश्चर्य तुमच्या दृष्टीस पडते. इथेच भारत बांगलादेश सीमा आहे! बांगलादेशी नागरिकांचा एक घोळका तिथे फिरत होता. तेही दावकी आणि भारत बघायला आले होते. तिथे ना खांब होते, ना तारा होत्या, ना कुंपण होते. फक्त एक पाटी होती की ही भारत बांगलादेश सीमा आहे. कृपया ओलांडू नये!

भारत बांगलादेश सीमा!
पलीकडचे बांगलादेशी नागरिक आहेत!

दिसली का पाटी? हीच सीमा आहे!

त्याच ईशान्य भारताच्या ट्रीपमध्ये आम्ही अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यातील परशुराम कुंड ला गेलो होतो. खूपच विशेष ठिकाण आहे ते. 

परशुराम कुंड 

परशुराम कुंडाविषयी मी परत कधीतरी लिहीन. आज मला तुम्हाला काही वेगळेच सांगायचे आहे. परशुराम कुंडाला जाण्यासाठी शेकडो पायऱ्या आणि त्याही पावसात, गारठवणाऱ्या वाऱ्यात चढल्या उतरल्यावर आम्हाला चक्क गरमागरम, ताजे तयार केलेले शुद्ध शाकाहारी चविष्ट अन्न मिळाले. जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला.

 खूप वेळ पावसात चालल्यावर गरमागरम भजी -आsss हा!

अरुणाचल प्रदेश मध्ये शाकाहारी जेवण मिळायला नशीबच लागते!


टी सेट आणि मस्त लेमन जिंजर टी!

जेवण झाल्यावर रेस्टोरंटच्या मालकिणीने आम्हाला तिथला खास काळा चहा दिला. टी सेट खूपच वेगळा दिसला म्हणून मी तिला विचारले की कुठून आणला? तर तिने सांगितले की ब्रम्हदेशाच्या बाजारातून! कसे काय विचारताच ती म्हणाली, हा जो मागे डोंगर दिसतो आहे ना? तो पार केला की ब्रम्हदेश आहे!

मला जे तिच्या बोलण्यातून समजले ते असे, की जानेवारीत तिथे एक विशेष जत्रा असते. काही जनजातीच्या लोकांना तिथे जायला किंवा तिकडून इथे यायला परवानगी आहे. अर्थात सीमेवर एक बॉर्डर पोस्ट आहे पण ते दूर आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम आणि मेघालय ह्या चार राज्यात भारत ब्रम्हदेश सीमाभाग आहे. जवळपास १५०० किलोमीटर ची ही सीमा आहे.

तिसरी सीमा आम्ही पहिली ती भारत चीन सीमा. इथे मात्र व्यवस्थित बॉर्डर पोस्ट, नो मॅनस लँड आणि लाईन ऑफ कंट्रोल पण आहे. ही सीमा अरुणाचल प्रदेश च्या तवांग जवळील बुमला पास येथे आहे.
 
बुमला पास बॉर्डर पोस्ट.

चौथी सीमावर्ती भागातील बॉर्डर पोस्ट आम्ही पाहिली ती साधारण २० वर्षांपूर्वी. ती जागा, तिथे रोज संध्याकाळी होणाऱ्या लोअरिंग ऑफ फ्लॅग्स सेरिमनी साठी खूप प्रसिद्ध आहे. ती आहे अटारी बॉर्डर जी पाकिस्तानच्या वाघा येथे जोडली गेलेली आहे. पंजाब मधील अमृतसरपासून साधारण २८ किलोमीटर वर हे ठिकाण आहे. रोज संध्याकाळी होणार रोमहर्षक सोहळा अनुभवण्यासाठी दोन्ही बाजूला हजारो प्रेक्षक जमलेले असतात.

File:Wagah - attari border ceremony.jpg - Wikimedia Commons
अटारी बॉर्डर कवायत 
(📷 Internet)
 
File:Wagah Border2014.jpg - Wikimedia Commons
अटारी येथील फ्लॅग डाऊन सेरिमनि 
(📷 Internet)

पाकिस्तान १९४७ पर्यंत भारताचा भाग असल्याने, साहजिकच खूप मोठी ३००० किलोमीटरच्या जवळपास लांब सीमारेषा आहे. गुजराथ, राजस्थान, पंजाब आणि जम्मू काश्मीर इथून ही सीमारेषा जाते. 

आपल्या देशाच्या सीमावर्ती भागात जाणे हा एक अगदी वेगळाच भावना कल्लोळ असतो. त्यातल्या काही भावना ओळखता आणि नाव घेऊन सांगता आल्याच तर त्या असतात, अत्यंत दुर्गम भागात, कसोटी पाहणाऱ्या हवामानात आपल्या सीमेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांविषयी आदर, अभिमान आणि कृतज्ञता! मला अजून काही सीमावर्ती भागात जायचे आहे..कधीतरी नक्की जाईनच. निघून जा रे बाबा कोरोना..आम्हाला घरात कोंडून ठेवू नकोस! 

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...