शनिवार, २६ सप्टेंबर, २०२०

Phnom Penh - कंबोडियाची राजधानी 

  

फुलांचे दुकान 

कमळांचा गुच्छ 

सुगंधी लिलियम्स 

सुगंधी लिलियम्स 

Phnom Penh मधील सेंट्रल मार्केट मधले हे एक फुलांचे दुकान आहे. लक्षात ठेवा की Phnom Penh चा उच्चार करताना सुरुवातीचा Ph आणि शेवटचा h सायलेंट आहे, त्याचा उच्चार करायचा नाही. म्हणजे फक्त नॉम पेन असे म्हणायचे. अवघड वाटते आहे का लक्षात ठेवायला? मग तुम्ही नॉम पेन च्या जुन्या नावाचा उच्चार करून पहा. तो कदाचित सोपा वाटेल. जुने नाव आहे Krong Chaktomuk Serimongkul!!! 

नॉम पेन मधील, म्हणजेच कंबोडियाच्या राजधानीमधील सेंट्रल मार्केट हे अगदी अवश्य जाण्याजोगे ठिकाण आहे. 

सेंट्रल मार्केट 
📷Wikimedia Commons

आर्ट डेको शैलीतील ही इमारत आहे. गडद पिवळ्या रंगाचा एक भव्य घुमट मध्यभागी आणि त्यातून निघालेली चार दालने अशी इमारतीची रचना आहे. हे सगळेच वेगवेगळ्या दुकानांनी गच्च भरलेले आहे. दागिने, टर्न, मौल्यवान खडे, भेट वस्तू, स्मृतिचिन्हे, कपडे, घड्याळे, खेळणी, भांडी ... तुम्ही कोणतेही नाव घ्या आणि बहुतेक ते इथे मिळेलच! 

मध्यभागी असलेला घुमट 
📷Wikimedia Commons


दुकानांनी गजबजलेले एक दालन .
📷Wikimedia Commons

हि इमारत १९३७ मध्ये बांधली गेली. आम्ही २०१२ मध्ये गेलो होतो तेव्हा नुकतेच ह्या इमारतीचे नूतनीकरण झाले होते. भरपूर गर्दीची जागा असेल तरी, इमारतीच्या छताची उंची आणि मोकळी, ताजी हवा खेळावी म्हणून केलेली जाळी ह्यामुळे तिथे घुसमटत नाही. पर्यटक आणि स्थानिक लोक, इथे सगळ्यांचीच गर्दी असते. 

नॉम पेन ही कंबोडिया/ कम्पूचीया ह्या देशाची राजधानी. कंबोडिया चा गतकाळ अतिशय वादळी घटनांनी ग्रस्त झालेला होता. कमोडियातील आद्य मानवी वसाहत अगदी ४००० B.C.मध्ये देखील अस्तित्वात होती ह्याचे पुरावे सापडले आहेत. हिंदू आणि बौद्ध धर्माचा,जीवनशैलीचा प्रभाव असणारी उर्जितावस्था काही शतके म्हणजे चौदाव्या शतकापर्यंत टिकली होती. त्यानंतरच्या चार शतकांचा इतिहास नीट नोंदलाच गेलेला नाही. त्या काळाला कंबोडियाचे डार्क एज म्हटले जाते. अनेक आक्रमणे, अनेक युद्धे ह्यामुळे कंबोडिया विनाशाच्या स्थितीला येऊन ठेपला होता. त्यानंतर जवळपास एक शतक फ्रेंचांचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष अंमल होता. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध नोंदला गेला तो राज्यपद्धतीत आणि शासन प्रणालीत झालेल्या बदलांमुळे. एकदोनदा नव्हेत तर अनेकदा हे बदल झाले. १९७५-७९ ह्या काळातील Khmer Rouge/ Pol Pot राजवटीतील वंशविद्वेष, वंशहत्या, नरसंहार, सामूहिक कत्तली हे तर मानवजातीच्या इतिहासातील काळा डाग म्हणूनच नोंदवले जातील. 
सध्या कंबोडियामध्ये घटनात्मक राजसत्ता आहे. २००४ पासून Norodom Sihamony हे राजा म्हणून निवडले गेले आहेत व आत्ताही सत्तेत आहेत. त्यांचे वडील King Sihanouk ह्यांचे बीजिंग येथे १५ ऑक्टोबर २०१२ ला निधन झाले व अंत्यविधी नॉम पेन येथे ४ फेब्रुवारी २०१३ ला झाला. आम्ही जेव्हा डिसेंबर २०१२ मध्ये नॉम पेन येथे गेलो होतो, तेव्हा त्यांचा मृतदेह रॉयल पॅलेस मध्ये ठेवलेला होता. शंभर सगळीकडे दिवंगत राजाचे फोटो असलेले मोठाले फलक लागलेले होते. 

 

भूतपूर्व राजा Norodok Sihanouk( १९२२-२०१२)


नॉम पेन ही फ्रेंचांनी बांधलेली राजधानी Tonle Sap, Mekong आणि Bassac ह्या तीन नद्यांच्या संगमावर वसलेली आहे.शहरात अनेक ठिकाणी नदीतीरावर सुंदर बाग आणि फिरण्यासाठी जागा विकसित केलेल्या आहेत. 

नदीच्या किनारी..

 संध्याकाळी ह्या बागांतून फेरफटका मारणे किंवा मग नावेने नदीतुन फिरून येणे ही नॉम पेन मधील संध्याकाळची विशेष आकर्षणे आहेत. 
नौकाविहार 

नावेमधून फिरताना तुम्हाला अनेक उंच उंच इमारतींची बांधकामे चाललेली दिसतात. लवकरच नॉम पेन ची क्षितिज रेषा ह्या बांधकामांनी भरून जाणार आहे किंवा खरे तर आटा पर्यंत भरून गेली देखील असेल. आपल्या वादळी भूकालावर, त्यामुळे झालेल्या पीछेहाटीवर मात करून नॉम पेन आधुनिक तंत्रज्ञानाकडे जगाच्या बरोबरीने जाउ पाहत आहे. 

ह्या सगळ्या प्रक्रियेत गावातून शहरात आलेल्या लोकांच्या लोंढ्याला पुरेशा नागरी सुविधा नॉम पेन मध्ये नाहीत. वाहतूक कोंडी ही नित्याची बाब आहे. पण काही लोकांनी ह्या अडथळ्यांवर मत केली आहे. ते चक्क बोटीवर तरंगत्या घरात राहत आहेत. तुम्ही ह्या फोटोत नीट पाहिलेत तर तुम्हाला एका नौकघरावर चक्क डिश अँटेना देखील दिसेल!

तरंगती घरे

ह्या शहराचे नाव नॉम पेन कसे पडले त्याची एक रंजक कथा सांगण्यात येते. चौदाव्या शतकात ,पेन नावाच्या एका आजीबाईंना एक लाकूड नदीवर तरंगताना दिसले. त्यांनी ते किनाऱ्यावर आणले. त्या लाकडात त्यांना चार बुद्धमूर्ती सापडल्या. असे म्हणतात की एक विष्णुमूर्ती देखील सापडली. त्या आजीबाईंनी ह्या सगळ्या मूर्तींसाठी टेकडी उभारून त्यावर मंदिर बांधले. म्हणून ह्या शहराचे नाव नॉम पेन - पेनबाईंची ची टेकडी असे पडले. त्या आजीबाईंनी बांधलेल्या मंदिराचे नाव आहे Wat Phnom.- टेकडीवरचे मंदिर. 

हि टेकडी साधारण ३० मीटर उंच आहे. संपूर्ण परिसरात मंदिरे,पॅगोडा,स्तूप वगैरे अनेक बांधकामे आहेत. ह्या संपूर्ण परिसराला वाट नॉम ऐतिहासिक परिसर म्हणून ओळखले जाते. 

मुख्य पॅगोडाकडे जाणाऱ्या पायऱ्या 

मुख्य पॅगोडा

भित्तीचित्र 

पॅगोडामधील बुद्ध मंदिर 

 Wat Phnom परिसरातील स्तूप 

टेकडीवरून दिसणारे दृश्य

नॉम पेन मधील बाकी काही पहिले नाहीत तरी राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय मात्र आवर्जून बघायला हवे. परंपरागत कलात्मक वास्तुशैलीतील ही टेराकोटाची इमारत फार सुंदर आहे. १०० वर्षांपूर्वी बांधल्या गेलेल्या ह्या इमारतीतील चौक , बाग, कृत्रिम तळे तसेच बागेची सजावट ह्या सगळ्यामुळे इमारत लक्षात राहते. 

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय -प्रवेशद्वार 

दर्शनी हॉल - गरुड 

वस्तुसंग्रहायलयाच्या आत फोटो काढायला परवानगी नाही. तिथे विष्णूच्या आणि शंकराच्या सुंदर मूर्ती आहेत. अंगकोर राजवट हा कंबोडियाच्या सुवर्णकाळ मनाला जातो. त्याच्या अनेक खुणा आपल्याला इथे पाहायला मिळतात. इथे संस्कृत मध्ये कोरलेले काही प्राचीन लेख देखील पाहायला मिळतात. संग्रहालय खरेच खूप मोठे आहे. 

जरी आत फोटो काढायला परवानगी नाही तरी मधल्या चौकात ,बागेत, प्रवेश करतो त्या हॉल मध्ये फोटो काढता येतात. ही बघा, ह्या सुंदर इमारतीतील काही दृश्ये. 


मध्यभागी असलेला चौक, बाग आणि तळे 

पारंपरिक वास्तुशैली

कृत्रिम तळे 

 
बागेतील गणेशमूर्ती

रॉयल पॅलेस परिसरात सध्याच्या राजांच्या निवासस्थानासोबतच इतरही अनेक महत्वाच्या इमारती आहेत. त्यातील बऱ्याच इमारती लोकांना बघण्यासाठी उपलब्ध आहेत. एक सिल्वर पॅगोडा आहे ज्यात चांदीच्या फरशा आहेत. एक पाचूची बुद्ध मूर्ती आहे. त्या मूर्तीवर हिरे आणि इतर मौल्यवान रत्ने जडवलेली आहेत. शाही सिंहासन असलेला एक हॉल आहे, जिथे खास बैठक होतात, विशेष अतिथींचे स्वागत केले जाते. पॅगोडाज आहेत,अजूनही काही इतर इमारती आहेत. इमारतींच्या आतल्या भागाचे फोटो घ्यायला परवानगी नाही. राजवाड्याच्या सर्वात जुन्या भागातल्या भिंतींवर रामायणातील काही भित्तिचित्रे आढळतात. 

रॉयल पॅलेस परिसरातील पॅगोडा 

रॉयल पॅलेस परिसरातील एक इमारत 

विपुल सोनेरी रंग

वैशिष्ट्यपूर्ण कळस 

राजवाड्यातील गणेश मूर्तींचा संग्रह 

शाही सिंहासन हॉल 

रॉयल पॅलेस परिसरातील पॅगोडा 

नॉम पेन मध्ये एक किलिंग ग्राउंड आहे जिथे हजारोंच्या, लाखोंच्या संख्येत लोक मारले गेले होते, शिवाय एक तिथे झालेल्या नरसंहाराच्या भीषण खुणा वागवणारे संग्रहालय आहे. पण मी हे दोन्हीही बघायला जाण्याइतका धीर गोळा करू शकले नाही. ह्या दोन्हीही जागा, त्या जी कहाणी सांगत आहेत ती कहाणी हा मानवतेवरील काळा डाग आहे. तुम्ही नेटवर शोधून ह्या विषयी आणखी माहिती वाचू शकता. 

राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयाच्या मैदानातील रंगमंचावर रोज एक सांगीतिक कार्यक्रम सादर होतो. आम्हाला जो कार्यक्रम पाहायला मिळाला त्यात कंबोडियातील रूढी,परंपरा दाखवणारा कार्यक्रम होता. जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या अनेक प्रथा त्यात दाखवलेल्या होत्या. एक विशेष गोष्ट अशी की लग्न समारंभातील काही रूढी ह्या भारतातील हिंदू विवाह पद्धतीशी साधर्म्य दाखवणाऱ्या होत्या. 


विवाहविधी 

विवाहविधी - प्रार्थना 

वधूवरांवर फुलांच्या पाकळ्या उधळणे 

मध्यभागी केलेल्या पूजेच्या भोवती फेरे

 साधारणपणे पर्यटक पाहतात त्या जागा जवळ जवळ आहेत. तुम्ही Sisowath Quay वर चालत चालत गेलात तर ह्यातील बरीच ठिकाणे पाहून होतात. 


नदीकिनारी असलेल्या बागेतून दिसणारे शहराचे सुंदर दृश्य 

सैनिकांचे पुतळे

नदीच्या किनारी 

अप्सरा डान्स बॅले हा कंबोडियातील प्रसिद्ध ग्रुप आहे. नॉम पेन शहरात ठिकठिकाणी तुम्हाला अप्सरा डान्स बॅले ची पोस्टर्स दिसतील. 

अप्सरा नर्तिकेचे पोस्टर

शहरातल्या प्रवासासाठी टॅक्सीज सहज उपलब्ध आहेतच. अजून एक खास वाहतुकीचा मार्ग उपलब्ध आहे तो म्हणजे स्कुटर रिक्षा!

स्कुटर रिक्षा 

तुम्ही कंबोडियात असाल आणि शाकाहारी किंवा विगन असाल, तर तुम्हाला अगदी जागरूक राहावे लागेल.अन्न करताना काय काय वापरले आहे त्याची चौकशी करायला हवी. कारण त्यांची शाकाहारी अन्नाची संकल्पना वेगळी असू शकते. आम्ही गावात फिरत होतो, बाजाराजवळून जाताना मला ही हातगाडी दिसली. मला ते काय आहे ते कळलेच नाही. लोक आपण भुईमुगाच्या शेंगा घेतो, मक्याची कणसे घेतो, फळांच्या फोडी घेतो आणि मग तो गाडीवाला त्यावर मसाला टाकून देतो, तसाच हा गाडीवाला देखील देत होता. मग मी जवळ जाऊन त्याचा फोटो घेतला. बघा, तुम्हाला ओळखू येतंय का? कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा. 

ओळख काय?!! कॉमेंट बॉक्स मध्ये लिहा!

नॉम पेन ला आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि बऱ्याच देशांशी विमान वाहुतुकीने कंबोडिया जोडला गेलेला आहे.आम्ही इथे दोन दिवस आणि दोन रात्री राहिलो होतो. आम्ही सिंगापूरहुन सिम रीप ला जाताना नोम पेन ला गेलो होतो. जर का तुमच्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही नॉम पेन ला दोन तीन दिवस द्या. नाहीतर मग नोम पेन ला एक दिवस एक रात्र देखील पुरेल. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय मात्र नक्की पहा. राष्ट्रीय वस्तुसंग्रहालय तुम्हाला कंबोडियाच्या इतिहास, संस्कृती, धर्म आणि कला ह्याबद्दल एक पार्श्वभूमी तयार करून देते, ज्या माहितीचा तुम्हाला सिम रीप जवळची अंगकोर आणि इतर मंदिरे पाहताना उपयोग होईल.
अंगकोरची मंदिरे तर प्रत्येकाने पाहायलाच हवीत अशीच. त्याबद्दल परत कधीतरी.

शनिवार, १९ सप्टेंबर, २०२०

मोहिनीराज - अद्वितीय अर्धनारीनटेश्वर मंदिर 

 ह्या मंदिराला भेट देताना माझ्या मनात मोहिनीराज ह्या नावाविषयी कुतूहल होते. मोहिनी हे स्त्रीचे नाव आणि सहसा राज येते पुरुषांच्या नावाच्या पुढे. मग हे दोन शब्द एकत्र कसे आले? ह्याविषयी अपार कुतूहल मनात घेऊनच मी ह्या मंदिराला भेट दिली. मोहिनीराज मंदिर, महाराष्ट्र राज्यातील, अहमदनगर जिल्ह्यातील, नेवासा ह्या गावी आहे. 

मोहिनीराज मंदिर, नेवासा 

संत ज्ञानेश्वरांनी लहिलेल्या ज्ञानेश्वरी ह्या ग्रंथात नेवाश्याचा उल्लेख आढळतो. हा ग्रंथ म्हणजे तेराव्या शतकात लिहिली गेलेली श्रीमद्भगवत गीतेवरील भावार्थ रचना आहे. हा ग्रंथ केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभरातील मराठी भाषिकांसाठी सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या अतिशय महत्वाचा मानला जातो.

ज्ञानेश्वरीत म्हटले आहे, " त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र जेथ जगाचे जीवनसूत्र श्रीमहालया असे. " ह्याचा अर्थ असा की श्रीमहालया क्षेत्राच्या भोवतीचा पाच कोसांचा भाग हा त्रिभुवनात पवित्र असून, हे क्षेत्र म्हणजे जणू जगाचे जीवनसूत्रच आहे. ज्ञानेश्वरी ह्याच परिसरात लिहिली गेली. 

ज्ञानेश्वरीतील नेवासा ह्या गावाचा उल्लेख 

प्राचीन काळी नेवासा ह्या गावाचे नाव निधीनिवास, श्रीमहालया असे होते. ह्या गावाच्या अनेक प्राचीन ग्रंथात असलेल्या उल्लेखामुळे, पुरातत्व शास्त्राच्या अभ्यासकांची उत्सुकता जागृत झाली. त्यांनी ह्या भागात उत्खनन करायचे ठरवले. उत्खनन मोहीम यशस्वी झाली आणि नेवासा क्षेत्रात मध्य पाषाणयुगातील अनेक हत्यारे सापडली. ह्या संबंधीचे शोध निबंध प्रसिद्ध झालेले आहेत. आपण आंतरजालावर देखील वाचू शकतो. 

ह्या मंदिरासंबंधीची कथा जरी पुरातन असली तरी मंदिर मात्र नवे आहे. किती नवे? तर हे मंदिर १७७३ मध्ये बांधले गेले असा उल्लेख सापडतो, म्हणजे अवघ्या २५० वर्षे वयाचे हे मंदिर आहे! 

समुद्र मंथनाच्या वेळी मंथनातून जेव्हा अमृत आणि सुरा - दारु निघाली तेव्हा त्याची वाटणी कशी करावी, असा प्रश्न निर्माण झाला. तेव्हा सगळे अमृत देवांच्या वाट्याला येऊन ते अमर व्हावेत आणि दानवांच्या वाट्याला फक्त दारू जावी ह्यासाठी मोहिनीरूप घेतले गेले. मोहिनी म्हणजे जिचा मोह पडेल, भुरळ पडेल अशी सुंदर स्त्री. मोहिनीने हे वाटपाचे काम चोखपणे बजावले. देवांच्या वाट्याला अमृत आले आणि दानवांच्या मद्य. 

ह्या मंदिरातील मूर्ती अर्धनारीनटेश्वराच्या रूपात आहे म्हणजे विष्णू आणि मोहिनी एकाच मूर्तीत आहेत. मूर्तीचा उजवा भाग विष्णुरूपातील तर डावा भाग मोहिनी रूपातील आहे. म्हणूनच ह्या मंदिराचे नाव मोहिनीराज मंदिर- मोहिनी आणि विष्णू मंदिर. असे म्हटले जाते की ह्या प्रकारची अर्धनारीनटेश्वराची मूर्ती असणारे हे एकमेव मंदिर आहे. 



मोहिनीराज 

शिव पार्वती दोघे एका मूर्तीत, अर्धनारीनटेश्वराच्या रूपात अनेक ठिकाणी बघायला मिळतात. पण विष्णू आणि मोहिनी असे बघायला मिळणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. 


मोहिनीराज मंदिर गर्भगृह 

मोहिनीराजाची डावीकडची लहान मूर्ती, जिच्यावर अभिषेक होतो अशी पंचधातूची मूर्ती आहे. उजवीकडची तिसरी मूर्ती लक्ष्मीची आहे. अर्धनारीनटेश्वराचे मंदिर असल्याने पूजा विधीच्या वेळी भक्त देवाला साडी, खण आणि धोतर असे सगळे अर्पण करतात. 

तेराव्या शतकात यादव राजवटीत प्रचलित असणाऱ्या हेमाडपंती वास्तुशैलीत हे सुंदर मंदिर बांधले गेलेले आहे. ह्या वास्तुशैलीला हेमाद्री/हेमाडपंतांचे म्हणजे यादव राजांच्या मुख्य प्रधानाचे नाव दिले गेलेले आहे. पण आता ज्या ज्या भागात नव्याने दुरुस्त्या झाल्या आहेत तिथे ही शैली कदाचित दिसणार नाही. 
 
मोहिनीराज मंदिर, प्रवेशद्वार 

प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला द्वारपालांच्या सुंदर मूर्ती आहेत. ह्या मूर्तींचे वैशिष्ट्य असे की त्यांच्या हातात शस्त्रे तर आहेतच, पण एकेक पक्षी देखील आहे. 

मंदिरातील कोरीवकामात अनेक सुंदर रचना दिसून येतात. चित्तवेधक भाग असा की अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या रचना इथे आढळतात. 

दर्शनी भागावरील सुंदर रचना 

कमळे, फुलांच्या आणि पानांच्या वेळी, हत्ती अशा अनेक रचना दर्शनी भागावर कोरलेल्या आढळतात. सज्जाच्या वरच्या भागात आपल्याला पानांचे तोरण असल्यासारखी रचना दिसते. 

मुख्य प्रवेशद्वार 

मुख्य प्रवेशद्वार धातूचे बनवलेले आहे. त्याच्या लगत दगडी भागात आल्याला साखळी आणि घंटा, वेली, वर्तुळातील फुले अशा विविध रचना आढळतात. ह्या छायाचित्रात द्वारपालाच्या हातातील पक्षी जवळून दिसतो आहे. बहुतेक हंस असावा. 

ह्या दारापर्यंत पोचण्यासाठी तीनचार पायऱ्या चढायला लागतात. दारातून मग दुसरा जिना सुरु होतो. त्याची पहिली पायरी खूपच उंच आहे. 
 

कोरीवकामातील विविध रचना 

बाहेरच्या वेगळ्या बाजूने काढलेले छायाचित्र 

हे बाहेरील भागाचे अजून एक छायाचित्र. ह्यात वर मागच्या बाजूला तुम्हाला एक पांढरे गोलाकार बांधकाम दिसेल. तो मंदिराच्या सभागृहाच्या छताचा भाग आहे. खरे तर हेमाडपंती शैलीत नेहमी हे देखील उंच शिखर असते किंवा जिथे असा गोलाकार आहे तिथे त्यावर देखील मुख्य शिखराप्रमाणेच कोरीवकाम केलेलं असते. पण इथे मोहिनीराज मंदिरात त्या गोलाकार भागावर बाहेरच्या बाजूने कोरीवकाम केलेले नाही. केवळ एक छोटेसे शिखर आहे. कदाचित सभागृहावरील मूळ कळस काही ज्ञात अज्ञात कारणांमुळे नष्ट झाला असेल आणि मग हेमाडपंती शैलीपेक्षा वेगळे असे हे बांधकाम केले असेल. 

सज्जा 

गर्भगृहाच्या/ गाभाऱ्याच्या शिखरावर म्हणजेच मंदिराच्या मुख्य शिखरावर खिडकीसारखा चित्तवेधक सज्जा दिसतो. पूर्वी कदाचित येथे देखील सुंदर मूर्ती असतील. 

आपण मंदिरात प्रवेश करताच समोर सभागृह येते ते आडव्या चौरस आकाराचे आणि गाभारा आपल्या डावीकडे दिसतो. हे नेहमीपेक्षा वेगळे आहे. सहसा आपण मंदिरात प्रवेश गेल्यावर उभट चौरसाच्या आकाराचे सभागृह दिसते आणि मग तिथून समोरच गाभारा दिसतो. 

त्यामुळे मग वाटले की कदाचित पूर्वी सध्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उजवीकडे मुख्य दरवाजा असणार. सध्या मात्र तिथे भिंत घालून तो बंद करण्यात आला आहे. त्या बाजूने प्रवेश केला तर आपल्यासमोर उभ्या चौरस आकारातील सभागृह येईल आणि मग गाभारा समोरच दिसेल. मोहिनीराज देवस्थानात नेहमी जाणाऱ्या भक्तांकडे चौकशी केल्यावर कळले की खरेच काही दशकांपूर्वी म्हणजे साठ सत्तर वर्षांपूर्वी पश्चिमेकडूनच मुख्य दरवाजा होता!

मंदिरात प्रवेश केल्यावर आपल्याला सुंदर कोरीवकाम केलेले सभागृह दिसते. छतावर रासक्रीडेत नाचणाऱ्या गोपी आणि कृष्णाच्या आकृती कोरलेल्या दिसतात. अतिशय प्रमाणबद्ध मानवी शरीराचा नमुनाच तिथे पाहायला मिळतो. 


सभागृहाचे छत 


कोरीवकाम 


साखळीला अडकवलेल्या घंटा, कमल पुष्पे, पाने अशा सुंदर रचना कोरीवकामात वापरलेल्या आढळतात. खांबांच्या अगदी वर छत तोलून धरणाऱ्या यक्षांच्या आकृती आहेत. बहुतेक यक्षच असावेत. मंदिरातील खांबात आकारांचे आणि रचनांचे विविध प्रकार हाताळलेले दिसतात. 

हे मंदिर शहराच्या मध्येच आहे. चहुबाजूने नागरी वस्ती आणि धावते रस्ते. गाडीबरोबर काढलेल्या ह्या फोटोमुळे तुमच्या लक्षात येईल की मंदिर किती उंच आहे! जवळपास ७५ फूट उंचीचे हे मंदिर आहे. माघ महिन्यात इथे मोठा उत्सव आणि जत्रा असते.

 

मोहिनीराज मंदिर, नेवासा

एकाच मूर्तीत विष्णू आणि मोहिनी रूप असणारे असे हे अद्वितीय मोहिनीराज मंदिर. आपल्याला मातृका माहिती आहेत. त्यात देखील वैष्णवी असते. वैष्णवी म्हणजे विष्णूची सर्व आयुधे धारण करणारी देवी. वैष्णवी रूपातील मूर्ती आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात. पण असे अर्धे पुरुष आणि अर्धी स्त्री असा देह असणारे विष्णूमोहिनीचे हे एकमेव मोहिनीराज मंदिर. 

मोहिनीराजाच्या ह्या रूपातून आपल्याला विश्वातील स्त्रीपुरुष परस्परपूरकता, एकता आणि समानतेचा संदेश मिळतो.

भगूर - सावरकर वाडा 

नाशिक  (महाराष्ट्र राज्य, भारत)  आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी...